चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना मोठा हादरा बसला आहे. चेन्नईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी ही घोषणा केली.
'राज्यातलं राजकारण बदलण्याची गरज आहे. तामिळनाडूतील राजकारण खूपच वाईट झालं आहे. लोकशाही मरणपंथाला लागली आहे. गेल्या वर्षभरात तामिळनाडूच्या राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे राज्य बदनाम झालं आहे. इथे असलेला पारदर्शकतेचा अभाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करु' अशा भावना रजनीकांत यांनी यावेळी बोलून दाखवल्या.
रजनीकांत यांच्या स्टाईलची फक्त दाक्षिणात्यच नाही, तर देश-विदेशातील प्रेक्षकांवर मोहिनी आहे. त्यांना असलेल्या मोठ्या चाहत्यावर्गाचा राजकीय क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रजनीकांत यांनी नव्या पक्षाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही.
तामिळनाडूत करुणानिधी, जयललिता यासारख्या अनेकांनी अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. रजनीकांत ही परंपरा कशी सुरु ठेवतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.