Raj Thackeray on Har Har Mahadev: अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नुकतेच स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. लोअर परळ येथील PVR मध्ये या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. या स्क्रिनिंगला अनेक दिग्गज कलाकारांनी तसेच नेते मंडळींनी हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांच्या आवाजातील हर हर महादेव या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवासांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता राज ठाकरेंनी हर हर महादेव हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, 'चित्रपट निर्मितीसाठी केलेली मेहनत या चित्रपटात दिसत आहे. खूप वर्षांनी उत्तम डायलॉग असलेला चित्रपट पाहिला. मी आनंद चित्रपट पाहताना भावूक झालो होतो. सहसा माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. पण या चित्रपटातील काही प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट पाहिला पाहिजे.'
अभिनेता शरद केळकर हा या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून झी स्टुडियोजच्या माध्यमातून भारतभरात प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच अभिनेता सुबोध भावे हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अमृता खानविलकर 'हर हर महादेव' या चित्रपटात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची अर्थात सोनाबाई देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुलतानी अंधार पसरलेला असताना जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट खास दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: