Har Har Mahadeo Song : झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला 'हर हर महादेव' हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरपासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहेत. नुकतंच या चित्रपटातील 'बाजी रं बाजी रं' गाणं प्रदर्शित झालं आहे. 


हर हर महादेव चित्रपटाचा ट्रेलर जितका दमदार आहे. तितकीच या चित्रपटातील गाणीही रोमहर्षक अनुभव देणारी आहेत. यामधील 'बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या शिलेदार वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाणेदार व्यक्तिमत्वाची आणि पराक्रमाची महती सांगणारं हे गाणं आहे. मंदार चोळकर हे या गाण्याचे गीतकार आहेत. तर, हितेश मोडक यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. तर, आपल्या बुलंद आवाजाने मनिष राजगिरे यांनी गाणं गायलं आहे. यातील 'वाह रे शिवा' हे गाण्याचा यापूर्वीच विविध म्युझीकल ऍप्सवर चार्टबस्टर लिस्टमध्ये समावेश झाला आहे. युट्युबवरही हे गाणं लाखो प्रेक्षकांनी बघितले असून त्याला आपल्या पसंतीची पावती देत भरभरून प्रतिक्रियाही दिल्या आहेत.


पाहा व्हिडीओ :



'बाजी रं बाजी रं' हे गाणं सळसळतं आणि नवी ऊर्जा निर्माण करणारं आहे. या गाण्यातील ओळीसुद्धा अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.


छाताडाचा कोट करून रणी उभा
संहाराचा रंग चढे दाही दिशा 
बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं
बाजी रं बाजी रं अंगार बाजी रं 


अशा जबरदस्त शब्दांत गीतकार मंदार चोळकर यांनी बाजीप्रभूंचं वर्णन यात केलं आहे.


शरद केळकरने साकारली बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका


अभिनेते शरद केळकर हे या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून हे गाणं त्यांच्यावरच चित्रीत झालं आहे. अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून झी स्टुडियोजच्या माध्यमातून भारतभरात प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


Har Har Mahadev: 'ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट'; 'हर हर महादेव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित