Money Laundering Case : 'जॅकलीनला फक्त प्रेम हवे होते, 200 कोटींच्या फसवणुकीत तिची कोणतीही भूमिका नाही असं पत्र  सुकेश चंद्रशेखर याने तुरुंगातून लिहिले  आहे. 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संशयीत आरोपी म्हणून सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. आता त्याने तुरुंगातून आपल्या वकिलाला पत्र लिहिले आहे.


सुकेशने आपल्या पत्रात लिहिले आहे की, 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिनची कोणतीही भूमिका नाही. सुकेशने सांगितले की, तो जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यातूनच महागड्या गिफ्ट्स आणि कारसह सर्व व्यवहार झाले. परंतु, 200 कोटींच्या फसवणुकीत तिचा कोणताही संबंध नाही. 
 
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200  कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सध्या चौकशी सुरू आहे.  जॅकलिन फर्नांडिस शनिवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली. जॅकलिनला दिलासा देत न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत तिच्या अटकेला स्थगिती दिली आहे.  10 नोव्हेंबर रोजी आता पुढील सुनावणी होणार आहे.     


सुकेशने पत्रात काय म्हटले आहे?
"जॅकलीनने फक्त प्रेमाची मागणी केली होती.  मी तिला आणि तिच्या  कुटुंबाला भेटवस्तू दिल्या होत्या. यात तिचा काय दोष? तिला माझ्याकडून प्रेम आणि तिच्या पाठीशी उभे राहण्याशिवाय कशाचीच अपेक्षा नव्हती. तिच्यावर आणि तिच्या कुटुंबासाठी जे काही पैसे खर्च झाले आहेत ते सर्व पैसे कायदेशीर मार्गाने कमावले होते. लवकरच हे ट्रायल कोर्टातही सिद्ध होईल" असे सुकेशने वकिलाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  


जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांचे फोटोही खूप व्हायरल झाले होते. सुकेशने जॅकलिनला महागडे गिफ्ट दिल्याचा आरोप आहे. जॅकलीनची स्टायलिस्ट लिपक्षी इलावाडीनेही चौकशीत सांगितले की, “जॅकलिनच्या कपड्यांचा ब्रँड जाणून घेण्यासाठी सुकेशने गेल्या वर्षी तिच्याशी संपर्क साधला होता. जॅकलिनसाठी कपडे खरेदी करण्यासाठी सुकेशने तिला तीन कोटी रुपये दिले. सुकेशकडून मिळालेली संपूर्ण रक्कम लिपाक्षीने फर्नांडिससाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केली होती.   


नेमकं काय आहे प्रकरण? 
200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर त्याने दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.   


महत्वाच्या बातम्या


Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसला दिलासा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला