Raj Thackeray Reaction on Chhava Controversy : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा चित्रपट वादात सापडला असताना आता त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. छावा चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी लेझीम हातात घेतलीही असेल, पण ते इतिहासात नाही. एका गाण्यावरुन उगाच चित्रपट पणाला का लावताय, असं सांगून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना लेझीमचा सीन हटवण्यास सांगितल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ते मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात बोलत होते.

Continues below advertisement


छावा सिनेमा प्रत्येकाने पाहायलाच हवा, राज ठाकरेंचं आवाहन


महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहायला पाहिजे. शिवछत्रपती ही प्रेरणा आहे आणि संभाजीराजे हे बलिदान आहे. छत्रपती शंभूराजांनी लेझीम हाती घेतलीही असेल, पण त्याचे पुरावे नाही. आपल्याकडे इतिहासकार सगळेच होऊ लागले आहेत, प्रत्येक गोष्टीत सर्वांच्या भावना दुखावतात. त्यामुळे लेझीमची सीन काढून टाका, असं लक्ष्मण उतेकरांना सांगितल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.


'एका गाण्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावताय?'


छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. याबद्दल सांगताना राज ठाकरे म्हणाले की, लेझीम हा आपला महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी कधी तरी लेझीम हाती घेतलाही असावा, काय माहित? इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तर असेल. एखाद्या गाण्यावरुन चित्रपट पुढे सरकतोय का की फक्त उत्सवाचं गाणं आहे. त्यावर  लक्ष्मण उतेकर म्हणाले की, फक्त उत्सवाचं गाण आहे. मग मी सांगितलं की, एका गाण्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावताय?


नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?


राज ठाकरे पुढे म्हणाले की, "आपल्याकडे हल्ली सगळ्यांना इतिहास समजायला लागलाय, सगळेच इतिहास तज्ज्ञ झाले आहेत. सगळ्या बाबतीत सगळ्यांच्या भावना उफाळून येतात. चित्रपट पाहायला लोकं जाणार तेव्हा औंरगजेबाने केलेले अत्याचार डोक्यात ठेवून जेव्हा लोक पाहायला जातील, तेव्हा लेझीम  नाचताना दाखवलंय, ते काढून टाका. महात्मा गांधींच्या आयुष्यावर चित्रपट काढताना, महात्मा गांधी दांडीया खेळताना दाखवल्यावर कसं वाटेल", असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 


पाहा व्हिडीओ : छावा चित्रपटाबद्दल राज ठाकरें काय म्हणाले?



 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


महाकुंभातील 'त्या' अप्सरेचं कंगना रणौतकडून कौतुक, बॉलिवूड अभिनेत्रींना निशाण्यावर घेत म्हणाली...