Raj Kundra : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने एका पॉर्न प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर तो जवळपास 60 दिवस मुंबईतील आर्थर रोड कारागृहात होता. आता तुरुंगात कैद्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचं पत्र राज कुंद्राने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला दिलं आहे.
जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राने 2021 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून तुरुंगात कैद्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचे म्हटले होते. कुंद्राने आपल्या पत्रात म्हटले आहे की, ज्या बॅरेकमध्ये 49 कैद्यांसाठी जागा आहे, तेथे 250 कैदी ठेवण्यात आले आहेत आणि रात्री झोपताना कोणीही हालचाल करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कोणत्याही नवीन कैद्यांना गर्दीच्या मध्यभागी झोपण्यास सांगितले जाते.
राज कुंद्रा दावा करत म्हणाला की,"कैदी खुलेआम धुम्रपान करतात आणि संपूर्ण बॅरेक धुराने भरलेली असते ज्यामुळे इतरांना त्रास होतो. कारागृहात खूप गर्दी असल्याचे कारागृह प्रशासन मान्य करत असून येथील जेवण दर्जेदार असून सुविधाही उच्च दर्जाच्या असल्याचा दावा केला आहे. कुंद्राने आपल्या पत्रात त्याला आलेला वाईट अनुभव लिहिला आहे.
राज कुंद्राचा 'यूटी 69' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
राज कुंद्रा सध्या त्याच्या 'यूटी 69' (UT 69) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा चर्चेत आला होता. पण आता अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तो सज्ज आहे. त्याच्या 'यूटी 69' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर शेअर करत राजने लिहिलं होतं,"माझं आयुष्य रोलर कोस्टरसारखं होतं. त्याचा एक भाग तुमच्यासोबत शेअर करत आहे". तर शिल्पानेही या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला होता. ट्रेलर शेअर करत तिने लिहिलं होतं,"कुकी..खूप खूप शुभेच्छा...तू एक धाडसी व्यक्ती असून मला तुझं खूप कौतुक वाटतं". 'यूटी 69' हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. त्यानंतर राज कुंद्राने त्याचे अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले होते. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्राला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते.
संबंधित बातम्या