Sandeep Pathak Raakh Movie : मराठमोळा अभिनेता संदीप पाठकचा (Sandeep Pathak) 'राख' (Raakh) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता 53 व्या 'गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' फिल्म मार्केटसाठी 'राख' सिनेमाची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी जाहीर केले आहे.
'गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' दरवर्षी सिनेसृष्टीतील दर्जेदार सिनेमांची निवड होत असते. तसेच अनेक सर्वोत्कृष्ट सिनेमे या महोत्सवात प्रदर्शित होत असतात. 'राख' सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'राख' हा एक मूकपट आहे. त्यामुळे या प्रयोगाचे सध्या सिनेसृष्टीत कौतुक होत आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा राजेश चव्हाणने सांभाळली आहे.
संदीप पाठक आणि अश्विनी गिरी 'राख' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. संदीप आणि अश्विनी दोघांनाही या सिनेमासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सावत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा सिनेमा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
'राख' सिनेमाचं कथानक काय?
अचानक उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना रोजगार गमावू लागल्याने, विपरीत परिणाम होऊन बेरोजगारीच्या संकटात भरडल्या गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या दाहक वास्तवाचे चित्रण या सिनेमात केले गेले आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) हा आशियातील सर्वात जुना तसेच भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. येत्या 20 नोव्हेंबर पासून गोव्यात हा महोत्सव होणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात 79 देशातील 280 सिनेमे दाखवले जाणार आहेत.
संदीपच्या अभिनयाचं कौतुक!
'रंगा पतंगा', 'डबल सीट' आणि 'पोस्टर गर्ल' यांसारख्या सिनेमांत संदीपने काम केलं आहे. या सिनेमांतील संदीपच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'वऱ्हाड निघालय लंडनला' या त्याच्या नाटकाचे नाट्यरसिकांनी कौतुक केलं आहे. आजही हे नाटक प्रेक्षक आवडीने पाहतात.
संबंधित बातम्या