Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच मुंबईहून दिल्लीला रवाना झाली आहे. तीन वर्षांनंतर 'देसी गर्ल' भारतात आली होती. त्यामुळे मुंबई सोडताना ती खूपच भावूक झालेली दिसली. सोशल मीडियावर तिने मुंबईतील प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियांका तिच्या हेअर केअर ब्रँडच्या प्रमोशनसाठी भारतात आली असल्याचं म्हटलं जात आहे.
व्हिडीओ शेअर करत प्रियांका म्हणाली आहे,"आता मुंबईतील प्रवास पूर्ण झाला आहे. घरी राहणं ही चांगली गोष्ट आहे. मला घरात राहायला आवडतं. घराची गोष्टच निराळी असते. घरी पुन्हा परतण्यासारखं दुसरं सुख नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मला जो पाठिंबा, प्रेम मिळालं ते पाहून मी भारावून गेले. अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्या टीमबरोबर तुम्ही नसता तर काहीच शक्य झालं नसतं.". व्हिडीओमध्ये ती चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसत आहे.
प्रियांका चोप्रा ब्रँडच्या प्रमोशनसाठी भारतात आली होती. भारतातील आठवणी कायम सोबत राहाव्यात यासाठी तिने सेल्फी आणि व्हिडीओही काढले आहेत. आता ती पुढील कामासाठी दिल्लीला रवाना झाली आहे. आपला देश सोडून पुन्हा दुसऱ्या देशात जायचं म्हटल्यावर प्रियांका भावूक झाली आहे.
प्रियांका चोप्राचे आगामी सिनेमे
प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. प्रियांकाचे दोन हॉलिवूड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. यात 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'एंडिंग थिंग्स' या सिनेमांचा समावेश आहे. तसेच 'जी ले जरा' हा बॉलिवूड सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
संबंधित बातम्या