मुंबई : देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर अधारित 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट रखडला होता. परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

मोदींचा बायोपिक 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु 11 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित केला जाऊ नये, यासाठी काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टाने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला. निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करण्यास बंदी घातली. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी केली जाणार असल्यामुळे 23 मे नंतर हा चित्रपट प्रदर्शित करता येऊ शकतो. त्यामुळे हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित कऱण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट जशोदाबेन, तर अभिनेते मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय बमन इराणी, ​झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय, प्रशांत नारायणन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.

सरबजीत, मेरी कोम यांसारख्या चरित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.