मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावर केंद्रीय निवडणूक आयोगासह सीबीएफसी आणि चित्रपटाचे निर्माते यांना उत्तर देण्याचे निर्देश देत हायकोर्टाने सोमवारी यावर तातडीची सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.


देशातील आगामी लोकसभा निवडणुका या पारदर्शकरित्या पार पडण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करत आरपीआय(आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी ही याचिका हायकोर्टात सादर केली आहे. 'आमचा चित्रपटाला विरोध नाही, मात्र ज्या काळात तो प्रदर्शित होतोय त्याला विरोध आहे. त्यामुळे हा चित्रपट निवडणुकांच्या काळात प्रदर्शित न होता निकालांनंतर प्रदर्शित करावा.' अशी मुख्य मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

येत्या पाच एप्रिलला चित्रपट देशभरात होणार प्रदर्शित होणार असून अभिनेता विवेक ओबेरॉय हा नरेंद्र मोदींच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट जशोदाबेन, तर अभिनेते मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय बमन इराणी, ​झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय, प्रशांत नारायणन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.

सरबजीत, मेरी कोम सारख्या चरित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.