खूप सारी लोकेशन्स, भरमसाठ व्यक्तिरेखा घेऊन चित्रपट बनणारे खूप आहे. पण नचिकेत सामंत या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच सिनेमात तुलनेनं अवघड कथानक घेतलं आहे. या कथानकाचा परीघ फार मोठा नसला तरी तो अवघड आहे. कारण या सिनेमातला ९० टक्के भाग हा गच्चीवर शूट झाला आहे. तर या सिनेमात आहेत मुख्य अशा केवळ दोन व्यक्तिरेखा. कलाकारांनी दिलेली उत्तम साथ, रेखीव पटकथा आणि नेटकं छायांकन यामुळे हा चित्रपट होल्ड होतो. म्हणूनच त्याचा पहिला प्रयत्न हा कोतुकास्पद ठरतो.


ही गोष्ट शारदा आणि श्रीराम यांची आहे. या दोघांची आपली अशी जगण्याची शेली आहे. शारदा मोठी मॉडेल आहे. तर श्रीराम आहे सेल्समन. तसा दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. श्रीरामने घरावर कर्ज घेतलंय. ते फेडण्यासाठी सावकाराकडून सतत तगादा लावला जातोय, आता तर त्याला एका दिवसाची मुदत देण्यात आली आहे. ठरलेल्या वेळेत पैसे दिले नाहीत तर घर रिकामं करण्याची वेळ श्रीरामवर आली आहे. काही करुन पैसे मिळवण्यासाठी तो घराबाहेर पडला आहे. पैशाची जमवाजमव करण्यात अडकलेल्या या मुलाला डायबेटिसही आहे. तो सिनेमात वेळोवेळी दिसत राहतो. कथानकाला वेग आणण्यासाठी त्याची मदतच झाली आहे. तर एकेठिकाणी चहा पीत असताना उंच इमारतीवर एक मुलगी गच्चीत उभी असलेली त्याला दिसते आणि तो ती गच्ची गाठतो. ही उभी असलेली मुलगी असते शारदा. तिच्या काही कारणाने ती आत्महत्या करणार आहे. ही बात श्रीरामच्या लक्षात येते आणि सिनेमाला वेग येतो.

दिग्दर्शकाने निवडलेला विषय पाहता अस्थिर, स्फोटक मनाचे अनेक पैलू यात दिसायला हवे होते. परिस्थितीने आलेली गुदमर हा एक भाग झाला. पण त्याचवेळी एक आत्महत्या करणारं मन आणि दुसरं ती रोखणारं मन यांच्या तयार होणारा ताण, त्यातून मनात येणारे प्रश्न, त्यांची भाषा याचे आणखी पदर दिसायला हवे होते असं वाटून जातं. चित्रपटाचा पूर्वार्ध फारच उत्तम बनला आहे. उत्तरार्ध होताना मात्र अनेक प्रसंग खेचल्यागत वाटतात. शारदाने लाथाडलेला चष्माही अनेक प्रश्न निर्माण करतो. एकमेकांना विचारले जाणारे साधे प्रश्न उत्तरार्धात फार उशिरा येतात. आणि सर्वात मोठा योगायोग येतो तो चित्रपटाच्या शेवटी.. अर्थात तो आत्ता सांगणं योग्य ठरणार नाही.

एक नक्की प्रिया बापट आणि अभय महाजन या दोघांनीही आपल्या अभिनयाने हा चित्रपट खेचून धरला आहे. प्रियाची भूमिका ही ऑथर बॅक म्हणता येईल. त्यात अभय महाजनने श्रीराम साकारताना वापरलेली व्हेरिएशन्स मजा आणतात. आशा शेलार, अनंत जोग या दोघांनीही छोट्या भूमिकांचं सोनं केलं आहे. पूर्वार्धात असलेलं पार्श्वसंगीत किंचित एकसूरी वाटतं. त्याचवेळी उत्तरार्धातलं शेवटची अंगाई हे गाणं मजा आणतं. चित्रपटाचा शेवटही गमतीदार केल्यानं हा सिनेमा पाहून थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांची मानसिकता पुन्हा तजेलदार होते यात शंका नाही.

हा एक नेटका चित्रपट आहे हे खरं. पण याचं अवकाश फार मोठं नाही. परीक्षार्थीने अत्यंत विश्वासाने ६० मार्काचा पेपर सोडवावा आणि त्याला १०० पैकी ६० गुण मिळावेत असा हा गच्ची चित्रपट म्हणता येईल. या चित्रपटाला मी देतो आहे चीअर्स... गो अहेड.