Paparazzi Photo Story : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या (NMACC) उद्धाटन सोहळ्यानंतर पापाराझी (Paparazzi) ट्रेंडमध्ये होते. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये पापाराझी कल्चर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यांचा कॉन्टेन्स वेगवेगळ्या वेबसाईटवर दिसत असतो. पापाराझी सतत सेलिब्रिटीजच्या मागे का धावत असतात? यामागचं आर्थिक गणित काय? करीना कपूर आणि मलायका अरोराच्या फोटोंना एवढी मागणी का आहे?  सेलिब्रिटींचे एक्सक्लुसिव्ह फोटो कसे मिळवतात?  सेलिब्रिटींची प्रत्येक माहिती पापाराझींना कशी मिळते ? या पापाराझींच्या फोटोची रंजक कहाणी जाणून घ्या...


करीना, मलायकाच्या फोटोंना सर्वाधिक मागणी का? 


विरल भयानीसाठी काम करणारा समित जाधव म्हणाला,"मी गेल्या 10 वर्षांपासून विरल भयानीसाठी काम करत आहे. माझ्या कामाची सुरुवात करीना कपूरच्या घरापासून होते. सकाळी 9.30-10 च्या दरम्यान करीना कपूर शूटसाठी बाहेर निघत असते. त्यावेळी तिचा पहिला फोटो काढला जातो. त्यानंतर 11.30 च्या दरम्यान मलायका अरोरा योगासाठी निघते. त्यावेळी तिच्या घराजवळ तिचा फोटो नाही मिळाला तर योगा सेंटरला जातो. करीना आणि मलायका हे सकाळचे दोन फोटो ठरलेले आहेत. 


करीना कपूरला फॉलो करत असताना कधी-कधी नितू कपूर, करिश्मा कपूर यांचेदेखील फोटो मिळतात. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक सेलिब्रिटींचे फोटो मिळतात. मलायकाच्या फोटोंना सर्वाधिक मागणी आहे. कारण तिचे स्पोर्ट्सचे आऊटफिट खूपच चांगले असतात. 


सेलिब्रिटींना फॉलो करत असताना कधी-कधी सेलिब्रिटी पुढे निघून जातात. तर कधी पापाराझी सिग्नलमध्ये अडकतात. कधी पापाराझी ट्रॅफिकमध्ये अडकतात. त्यानंतर पापाराझींना पुन्हा तो स्पीड पकडून सेलिब्रिटींना फॉलो करावं लागतं. सेलिब्रिटी अनेकदा रात्री पार्टिला जात असतात. त्यावेळी त्यांचे फोटो काढताना त्यांच्या गाड्या पापाराझींच्या पायावरुन गेल्या आहेत. कॅमेऱ्याच्या लेन्सला फटका बसला आहे, फ्लॅट तुटला आहे. 


मानव मंगलानी यांच्यासाठी काम करणारा सागर कदम म्हणाला,"दररोज सेलिब्रिटींना शोधणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. सकाळी जीमला जाताना सेलिब्रिटी दिसतात. जर ते जीममध्ये दिसले नाही तर डबिंगच्या ठिकाणी जावं लागतं. डबिंग स्टुडीओमध्ये सेलिब्रिटी असतील तर त्यांच्या गाड्या असतात. त्या गाड्यांचे नंबर प्लेट आम्हाला माहिती आहेत. त्या गाड्यांच्या नंबर प्लेटवरुन कोणता सेलिब्रिटी असेल याचा आम्ही अंदाज बांधतो". 


शाहरुखच्या 'त्या' फोटोमागची गोष्ट काय आहे? (Shah Rukh Khan Viral Photo)


सागर कदम पुढे म्हणाला,"शाहरुख खानचा एक एक्सक्लुसिव्ह फोटो मी क्लिक केला आहे. शाहरुखचा 'पठाण' सिनेमातील लूकचा फोटो मी अंधेरीत काढला होता. त्या फोटोसाठी मी खूप कष्ट घेतले आहेत. सलग 4-5 दिवस मी शाहरुखला फॉलो करत होतो. पण सुरक्षारक्षकांमुळे मला फोटो क्लिक करता येत नव्हता. त्यामुळे मी एक गार्डन शोधलं आणि एकादिवशी शाहरुखचा फोटो क्लिक केला". 


रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखला पापाराझी हक्काने दादा-वहिनी म्हणून हाक मारतात. जग्गू दादाला भिडू, रणवीर सिंहला बाबा, करीनाला बेबो, कश्मिला लोलो, मलायकाला मल्ला अशी नावं पापाराझींनी सेलिब्रिटींना ठेवली आहेत. 



संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 12 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!