Pankaj Udhas : आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas Passed Away) यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उधास यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले. 1980 मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या मार्फत त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली. या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. पंकज उधास यांचे मुकरार, तरन्नम, मेहफिल आदी गाणी चांगलीच लोकप्रिय झाली.
गझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर, महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.
चांगला मित्र गमावला: सुरेश वाडकर
पंकज उधास यांनी आपल्या गझलने समस्त दुनियेला आनंद दिला. ते आपल्यातून गेले, ही धक्कादायक बातमी आहे. पंकज उधास यांचं जाणं फारच वाईट झालं, त्यांच्या कुटुंबाबत विचार करुन माझ्या अंगावर काटा येतोय. पंकज उधास यांच्या खजाना या अल्बमचं पुन्हा येणार होते. माझ्या शाळेत त्याच्या रिहर्सल्स सुरु होत्या. पंकज उधास उच्चशिक्षित होता, इतका मोठा गाणारा माणूस, चांगला मित्र आज आम्ही गमावला. त्यांच्या कुटुंबीयांना इतका मोठा धक्का पचवण्याची शक्ती इश्वर देवो, ही प्रार्थना अशा शब्दात ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी शोक व्यक्त केला.
पंकज उधास यांच्या निधनाने गझलचे मोठे नुकसान : भीमराव पांचाळे यांची प्रतिक्रिया
पंकज उधास यांचं जाणं हे गझलचं मोठं नुकसान आहे. आमच्या कमी भेटी झाल्या, पण त्या लक्षात राहणाऱ्या होत्या. खूप मोठा माणूस होता. अतिशय साधा आणि संवादी पद्धतीने गझल सादर करत होते. त्यांच्या गायकीची वेगळी पद्धत निर्माण झाली होती, ती अतिशय लोकप्रिय होती. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली. गझल गायक क्षेत्रात खूप संख्या कमी आहे. अन्य गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे, त्यात असे मोहरे जाणं हे धक्कादायक आहे. आमच्या गझल क्षेत्राचं मोठं नुकसान आहे, अशी प्रतिक्रिया गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी दिली.
पंकज उधास यांची लोकप्रिय गाणी
चिट्टी आयी है...
और आहिस्ता कीजिए बातें....
ना कजरे की धार...
चांदी जैसा रंग है तेरा...
मत कर इतना गुरुर....
आज फिर तुम पर प्यार आया है....