Panchayat Actor : 'पंचायत 3' (Panchayat 3) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमधील सर्वच कलाकार सध्या चर्चेत आहेत. 'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानने (Asif Khan) आपल्या करिअरमध्ये अनेक वाईट दिवस पाहिले आहेत. संघर्षमय प्रवासात अभिनेत्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे. अभिनेत्याने नुकताच खुलासा केला आहे की, त्याने सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूरच्या (Karina Kapoor) रिसेप्शन पार्टीत वेटरचं काम केलं होतं.
आसिफ खानने 'मिर्झापूर','पंचायत','पाताल लोक','पगलैट' आणि 'ह्यूमन'सारख्या ओटीटी सीरिजमध्ये काम केलं आहे. पंचायत सीरिजमधील त्याचा 'गज्जब बेज्जती है यार' हा डायलॉग चांगलाच गाजला. अभिनय क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करेपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. अनेकांप्रमाणे त्याला संघर्ष करावा लागला. टॉपमध्ये राहण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. संघर्षाच्या काळात तो करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नात वेटरचं काम करत असे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आसिफ खानने अभिनेता होण्यासाठीचा त्याचा संघर्षमय प्रवास शेअर केला आहे. मायानगरीत स्वत:ला सिद्ध करणं सोपं नाही. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी आसिफच्या खांद्यावर आली. त्यामुळे त्याने अनेक छोटी-मोठी कामे केली.
करीना कपूर-सैफ अली खानच्या पार्टीत केलंय काम
आसिफ म्हणाला,"मी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं आहे. हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केल्यावर काही दिवसांनी मी किचन डिपार्टमेंटमध्ये काम करायला लागलो होतो. हॉटेलमध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. हॉटेलमधील ही पार्टी म्हणजे करीना कपूर आणि सैफ अली खान यांचं रिसेप्शन होतं".
आसिफ पुढे म्हणाला,"हॉटेलमधली नोकरी सोडली आणि एका मॉलमध्ये काम करायला सुरुवात केली. मॉलमध्ये काम करत असताना ऑडिशन द्यायलाही सुरुवात केली. जयपुर, राजस्थानमधील एका थिएटर ग्रुपमध्ये सामिल झालो. पुढे कास्टिंग असिस्टंट म्हणून तो काम करू लागला. 'टॉयलेट:एक प्रेम कथा','परी','पगलॅट' सारख्या अनेक चित्रपटांत आसिफने छोट्या-मोठ्या भूमिका स्वीकारल्या.
'पंचायत 3'बद्दल जाणून घ्या...
'पंचायत 3' ओटीटी विश्वातील लोकप्रिय सीरिज आहे. आतापर्यंत या सीरिजचे तिन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 28 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज झाली आहे. 'पंचायत 3'मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 60-80 कोटींच्या बजेटमध्ये या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या