Panchayat 3 : 'पंचायत 3' (Panchayat 3) ही वेबसीरिज सध्या चर्चेत आहे. पहिले दोन सीझन हिट झाले असून तिसरा सीझनही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. पहिला दोन भागांप्रमाणे तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. या सीरिजमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रधान जी आणि सचिव जीप्रमाणे जगमोहनच्या भूमिकेचंही चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे. विशाल यादवने (Vishal Yadav) या भूमिकेला न्याय दिला आहे.
विशाल यादव हा मुळचा बिहारमध्ये राहणारा आहे. त्याला बालपणीपासूनच अभिनयाची आवड होती. लहान वयातच त्याने स्टेजवर काम करायला सुरुवात केली. शाळेतील स्टेजवर काम केल्यानंतर वेबसीरिजपर्यंत त्याने मजल मारली. छोट्या कुटुंबात जन्मलेल्या विशालने अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि दिल्ली गाठली.
शिक्षण सोडलं अन् दिल्ली गाठली...
विशाल यादव म्हणाला,"दिल्लीला गेल्यावर मी अभिनय खऱ्या अर्थाने शिकलो. तिथे नाटकाटी संहिता लिहिली, दिग्दर्शन केलं आणि मुख्य भूमिकेत कामही केलं. त्यावेळी माझं एक नाटक खूप गाजलं. त्यावेळी मी मंटोंची भूमिकाही साकारली होती. माझ्या अभिनयाचं लोकांनी कौतुक केलं. पुढे हिंदीसह इंग्रजी नाटकांमध्येही मी काम केलं".
आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना विशाल यादव म्हणाला,"मुंबईत आल्यानंतर अनेक लोकांनी मला चित्रपटासाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. 250 लोकांमध्ये मी ऑडिशन देत होतो. निवड होत नसल्याने निराश होत होतो. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले".
बहिणीमुळे बदललं नशीब
विशाल म्हणतो,"आईची प्रकृती खालावली होती. त्यावेळी तिच्याकडे लक्ष देण्यासाठी घरी कोणी नव्हतं. त्यामुळे आईसाठी मी घरी परतलो. तेव्हा माझ्या छोट्या बहिणीने मला समजावलं की, मुंबईत जा.. कामावर लक्ष दे. आयुष्यात नेहमी पुढे जायला हवं. त्यानंतर मी मुंबईत आलो आणि प्रगती करू लागलो. पुढे TVF मध्ये माझी निवड झाली. निर्माते म्हणाले की,"पंचायत 3'मध्ये जगमोहनची भूमिका विशाल यादवच करणार". विशाल यादवने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आणि वेबसीरिजमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. आता त्याच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या