Panchayat 3 Durgesh Kumar Aka Banrakas : 'पंचायत' या (Panchayat) वेब सीरिजने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. सोशल मीडियावरही या वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. 'पंचायत' वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिसऱ्या सीझनची उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वीच पंचायत वेब सीरिज रिलीज झाली. या तिसऱ्या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळाला. 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये सगळ्याच पात्रांनी लक्ष वेधून घेतले. पण, आपल्या अभिनयानेच नव्हे तर मीम टॅम्पलेटच्या माध्यमातून बनराकस अर्थात भूषण या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. बनराकसची छोटीशी व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता दुर्गेश कुमारचा (Durgesh Kumar) प्रवास हा कठीण, संघर्षाचा राहिला आहे.
बिहारच्या कलाकाराने वाजवला डंका...
अभिनेता दुर्गेश कुमार हा बिहारमधील दरभंगा येथील आहे. दुर्गेश कुमारने हायवे, बहन होगी तेरी, संजू, धडक सारख्या चित्रपटात काम केले. पण, पंचायत या वेब सीरिजमध्ये मिळालेल्या भूषणच्या व्यक्तीरेखेने दुर्गेशला लोकप्रिय केले. दरभंगातील एका लहानशा गावातून आलेल्या दुर्गेशचा सिनेजगतातील प्रवास सोपा नव्हता. जोश टॉकला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या करिअरच्या प्रवासाबाबत सांगितले.
दुर्गेश कुमार यांनी सांगितले की, मी ज्या ठिकाणाहून येतो. त्या ठिकाणी राहून तुम्ही अभिनेता बनण्याचा विचारही करू शकत नाही. पण, वृत्तपत्रांमध्ये मनोज वाजपेयींचा फोटो पाहून तेव्हा मला वाटायचे की बिहारचे लोकही हिरो बनू शकतात. बिहारमधला कोणताही मुलगा किंवा मुलगी UPSC ला आले की, माझे भाऊ-बहिण त्याचा/तिचा फोटो दाखवून मला UPSC साठी प्रेरित करायचे. यानंतर माझ्या भावाने मला थिएटरमध्ये जाण्यास सांगितले. व्यक्तिमत्व विकासासाठी नाटकात काम करण्यास सांगितले.
दुर्गेश कुमारने पुढे सांगितले की, नाटकात काम करणे मला आवडू लागले. त्यानंतर भावाने मला 12 वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यास सांगितले. त्यानंतर पुढील नाट्य शिक्षण कुठे मिळते हे पाहुयात असे सांगितले. माहिती घेतल्यावर दिल्लीत नाट्य प्रशिक्षण घेता येईल असे समजल्याने मी आणि भाऊ दिल्लीत आलो. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नोएडातील एका शाळेत शिकवू लागलो. त्याचवेळी एनएसडीमध्ये माझे शिक्षण सुरू झाले.
अॅडल्ट चित्रपटात केले काम...
दुर्गेशने सांगितले की, एनएसडीमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत आलो. कसेबसे त्याला इम्तियाज अलीच्या 'हायवे' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्याला 'फ्रीकी अली' आणि 'सुलतान'मध्ये छोट्या भूमिका मिळाल्या. पण तरीही त्याच्या जीवनातील गरजा पूर्ण करण्या इतपत पैसे मिळत नव्हते.
उदरनिर्वाहासाठी त्याने सॉफ्ट पॉर्न चित्रपटांमध्येही काम केले असल्याचे दुर्गेशने सांगितले. त्याने म्हटले की, 'मी अभिनयाशिवाय राहू शकत नाही. भूमिका कोणतीही असो, मी ती नेहमीच उत्कटतेने साकारतो. निर्मात्यांनी चित्रपटासाठी कितीही पैसे गुंतवले असतील, मी त्या खर्चाची परतफेड करेन. माझा स्वतःवर इतका विश्वास होता. त्यामुळेच मी बालाजीच्या 'व्हर्जिन भास्कर' सीरिजमध्ये काम केले.
डिप्रेशनमध्ये केले चित्रीकरण...
आपल्यालाही डिप्रेशनचा सामना करावा लागला असल्याचे दुर्गेशने सांगितले. वर्ष 2013 ते 2022 या जवळपास 10 वर्षाच्या कालावधीत मला ऑडिशनमध्ये यश मिळत नव्हते. कास्टिंग डायरेक्टर मला सांगायचे की तू चांगला अभिनय करू शकतो. तुझ्यात क्षमता आहे. पण मी ऑडिशन पास करू शकत नव्हतो. मी प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्यांचा विश्वास जिंकू शकत नव्हतो. मग, लॉकडाउन सुरू झाले. या कालावधीत मला काम मिळू लागले.
एके दिवशी मला 'कास्टिंग बे'मधून ऑडिशनसाठी कॉल आला. त्यांनी सांगितले एक सीन आहे, फोटोग्राफरची भूमिका आहे करणार का? मी जाऊन ऑडिशन दिले, तीन टेक मध्ये माझे ऑडिशन शॉट ओके झाला.
त्यानंतर मला पंचायतच्या पहिल्या सीझनमध्ये एक सीन दिला. हा एक सीन चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आज लोकांच्या मनात ही व्यक्तीरेखा असल्याचे दुर्गेश कुमार यांनी सांगितले.