Pakistan: पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता एका पाकिस्तानमधील अभिनेत्रीच्या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या ट्वीटमध्ये त्या अभिनेत्रीनं लिहिलं आहे की, तिला भारताचे पंतप्रधान आणि 'रॉ' या भारतीय गुप्तचर एजन्सीविरुद्ध तक्रार करायची आहे. आता या पाकिस्तानी अभिनेत्रीच्या ट्वीटला दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) ट्विटर अकाऊंटवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सहार शिनवारीचे ट्वीट
सहार शिनवारी (Sehar Shinwari) नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्रीनं ट्विटरवर एक ट्वीट शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. सहारनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'दिल्ली पोलिसांची ऑनलाइन लिंक कोणाला माहित आहे का? माझ्या पाकिस्तान या देशात अराजकता आणि दहशतवाद पसरवणारे भारताचे पंतप्रधान आणि भारतीय गुप्तचर एजन्सी रॉ यांच्या विरोधात मला तक्रार दाखल करायची आहे. मला खात्री आहे की, भारतीय सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल.'
दिल्ली पोलिसांचा रिप्लाय
सहार शिनवारीच्या ट्वीटला दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी रिप्लाय दिला, आम्हाला पाकिस्तानमध्ये अधिकार क्षेत्र नाही. पण तुमच्या देशात इंटरनेट बंद असताना तुम्ही कसे ट्विट करत आहात? हे जाणून घ्यायला आवडेल!'
सहार शिनवारीच्या ट्वीटची आणि दिल्ली पोलिसांनी तिला दिलेल्या रिप्लायची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर राजधानी इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच तिथे ट्विटरसह सर्व सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. याशिवाय आज 10 मे रोजीही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही अटक केली जाऊ शकते, असे संकेत पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: