RRR Oscars 2023 Nomination:  मनोरंजन विश्वातील सगळ्यात मोठा आणि मानाचा पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ची (Oscars 2023) उत्सुकता सगळ्यांनाच असते. नुकताच भारताकडून ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा चित्रपट ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आला होता. या चित्रपटाचे नाव जाहीर झाल्यापासून चाहते त्यावर टीका करत होते. तर, या वर्षीचा सगळ्यात मोठा चित्रपट म्हणून चर्चेत आलेल्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाला मात्र या यादीतून हटवण्यात आले होते. यंदा भारताकडून ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट ऑस्कर नामांकनासाठी पाठवला जाईल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, ‘छेल्लो शो’चे नाव जाहीर झाल्यानंतर मात्र चाहत्यांचा भ्रमनिरास झाला होता. पण, आता ‘आरआरआर’ने ऑस्कर शर्यतीत अधिकृत एन्ट्री घेतली आहे.


‘आरआरआर’ला ऑस्करमध्ये एन्ट्री न मिळाल्याने चाहते नाराज होते. मात्र, आज चाहत्यांना आनंदाचा धक्का देत ‘आरआरआर’ने ऑस्कर नामांकनामध्ये अधिकृत एन्ट्री घेतली आहे. इतकंच नाही, तर ‘आरआरआर’ला एक-दोन नव्हे तर तब्बल 14 विभागांमध्ये नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आलं आहे.


चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण


एसएस राजमौलींचा ‘आरआरआर’ ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आल्याचे कळताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ‘आरआरआर’चा ऑस्कर प्रवास आता सुरू झाला आहे. ‘RRR’च्या टीमने विविध श्रेणींमध्ये अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज पाठवले आहेत.


एक-दोन नव्हे अनेक विभागांमध्ये नामांकन!


ऑस्कर नामांकनांच्या बहुतांश श्रेणींमध्ये ‘आरआरआर’च्या नावाचा सहभाग नोंदवण्यात  आला आहे. या नामांकनामध्ये पाठवण्यात आलेल्या प्रवेशिकांमध्ये' सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी डीव्हीव्ही दानय्या (DVV Danayya), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी एसएस राजामौली (SS Rajamouli), मूळ पटकथेसाठी एसएस राजामौली आणि व्ही विजयेंद्र प्रसाद (Rajamouli and V Vijyendra Prasad), मुख्य अभिनेत्यासाठी ज्युनियर एनटीआर आणि राम चरण (Junior NTR And Ram Charan), सहाय्यक अभिनेत्यासाठी अजय देवगण (Ajay Devgan), सहाय्यक अभिनेत्रीसाठी आलिया भट्ट (Alia Bhatt), मूळ गाणे नाटू नाटू (Naatu Naatu) यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सिनेमॅटोग्राफी, प्रोडक्शन डिझाईन, फिल्म एडिटिंग, कॉस्च्युम डिझाईन इत्यादीसाठीही या चित्रपटाला नामांकन मिळावे म्हणून अर्ज पाठवण्यात आले आहेत.



‘आरआरआर’च्या निर्मात्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘हे आता अधिकृत झाले आहे, #RRRMovie चित्रपट FYC पुरस्कार/ऑस्कर शर्यतीत सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पाठवला जात आहे, @ssrajamo सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,  सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरण, पटकथा, मूळ गाणे, स्कोअर, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, ध्वनी, निर्मिती डिझाइन, व्हीएफएक्स आणि इअतर आणखी काही विभाग..’


संबंधित बातम्या


RRR Hindi On Netflix : ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’