Sanjay Mishra Birthday : बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) आज (6 ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. संजय मिश्रा हे नाव सिनेरसिकांसाठी तसे नवे नाही. संजय मिश्रा यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर खूप नाव कमावले आहे. चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक सहाय्यक भूमिका केल्या होत्या. प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करण्याचं कसब त्यांना चांगलंच अवगत आहे. संजय मिश्रा हे त्यांच्या विनोदी व्यक्तिरेखांसाठी अधिक ओळखले जात असले, तरी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गंभीर भूमिकाही अतिशय उत्तमप्रकारे साकारल्या आहेत.
संजय मिश्रा यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी बिहारमधील दरभंगा येथे झाला. संजय मिश्रा 9 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब वाराणसीला स्थायिक झाले. त्यांनी वाराणसीच्या केंद्रीय विद्यालय बीएचयू कॅम्पसमधून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर, 1989 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 1991मध्ये दरम्यान त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अभिनय विश्वात पाऊल ठेवले. अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण
संजय मिश्रा यांनी 'चाणक्य' या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोनंतर संजय मिश्रा यांनी आपले पाऊल बॉलिवूडकडे वळवले. 1995मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'ओ डार्लिंग ये है इंडिया' या चित्रपटात त्यांनी काम केले होते. या चित्रपटात त्यांनी हार्मोनियम वादकाची भूमिका साकारली होती. मात्र, 1998 मध्ये आलेल्या 'सत्या' या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळाली. ‘सत्या’ चित्रपटामध्ये त्यांनी विठ्ठल मांजरेकरांची भूमिका साकारली होती.
संजय मिश्रा यांनी अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. 2005 क्रिकेट विश्वचषकादरम्यान त्यांची 'मौका मौका' ची जाहिरात चांगलीच लोकप्रिय झाली होती. या जाहिरातीत तो ‘अॅपल सिंह’ची भूमिका साकारताना दिसले होते. या जाहिरातीतील संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे कौतुकही झाले. याशिवाय 'ऑफिस ऑफिस' या टीव्ही शोमधील त्यांनी साकारलेले ‘शुक्ला’जींचे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘धमाल’ चित्रपटात त्यांनी साकारलेला पोलीसही प्रेक्षकांना आवडला होता.
अचानक मनोरंजन विश्वातून घेतली एक्झिट
इंडस्ट्रीत चांगले यश मिळत असतानाच एके दिवशी अचानक संजय मिश्रा यांनी अभिनयविश्वातून काढता पाय घेतला. या दरम्यान त्यांनी एका ढाब्यावर काम करायला सुरुवात केली. यामागे वडिलांचा मृत्यू हे कारण होते. संजय मिश्रा त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होते आणि वडिलांच्या जाण्यानंतर ते इतके कोलमडून गेले की, मनोरंजन विश्व देखील त्यांना सावरू शकलं नाही. यानंतर त्यांनी थेट ऋषिकेश गाठत तेथील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली.
रोहित शेट्टीमुळे झाली वापसी!
या दरम्यानच्या काळात दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टी 'ऑल द बेस्ट' हा चित्रपट बनवत होता. या चित्रपटातील एका भूमिकेसाठी त्यांना संजय मिश्रांची आठवण आली. त्यानंतर त्याने संजय मिश्रांचा शोध घेत त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला संजय मिश्रा यांनी नकार दिला, पण नंतर रोहित शेट्टीने त्यांची समजूत काढली आणि या चित्रपटानंतर संजय मिश्रा यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
हेही वाचा :