Oscar 2024 : अँड द ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकण्यासाठी हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत असंख्य कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या ऑस्कर (Oscar 2024) पुरस्कार सोहळ्याची भारतीयांमध्येही फार उत्सुकता आहे. 10 मार्च 2024 रोजी ऑस्कर अवॉर्डचं (96th Academy Awards) आयोजन करण्यात आलं आहे. 11 मार्च 2024 रोजी भारतीय सिनेरसिकांना या पुरस्कार सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहता येणार आहे.


जगभरातील सिनेप्रेमी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विनोदवीर जिमी किमेल (Jimmy Kimmel) चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतात 'ऑस्कर अवॉर्ड्स' कधी, कुठे आणि कसं पाहू शकतात हे जाणून घ्या...


'ऑस्कर 2024' कधी पार पडणार? 


'ऑस्कर 2024' हा पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये 10 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अमेरिकेतील रेड कार्पेटवर रविवारी रात्री हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तर भारतात सोमवारी सकाळी 11 मार्च 2024 रोजी या पुरस्कार सोहळ्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. 






भारतात कधी पाहाल 'ऑस्कर 2024'? (Oscar 2024 Live Streaming)


भारतीय सिनेप्रेमी 'ऑस्कर 2024' हा पुरस्कार सोहळा 11 मार्च 2024 रोजी सकाळी 4.00 वाजता डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहू शकतात. डिज्नी प्लस हॉटस्टारने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ऑस्कर नामांकित सिनेमांची एक रील शेअर केली आहे". या रीलमध्ये किलर्स ऑफ द फ्लावर मून, ओपनहाइमर, बार्बी, मेस्ट्रो, पुअर थिंग्स अशा अनेक सिनेमांची झलक पाहायला मिळत आहे. 


'ऑस्कर 2024'मध्ये 'ओपनहायमर'ला सर्वाधिक नॉमिनेशन


क्रिस्टोफर नोलनच्या (Christopher Nolan) 'ओपनहायमर' (Oppenheimer) या ब्लॉकबस्टर सिनेमाला 'ऑस्कर 2024'मध्ये सर्वाधिक नामांकन मिळालं आहे. या सिनेमाला एकूण 13 नामांकन मिळाले आहेत. 


भारताच्या 'टू किल अ टायगर' माहितीपटाला नामांकन 


भारताच्या 'टू किल अ टायगर' (To Kill a Tiger) या माहितीपटाला 'ऑस्कर 2024'मध्ये नामांकन मिळालं आहे. झारखंड राज्यातील एका छोट्या गावावर आधारित हा माहितीपट आहे. या माहितीपटात एका 13 वर्षीय मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. त्यानंतर मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांचा संघर्ष या माहितीपटात दाखवण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या


Oscars 2024 Nominations: बार्बी अन् ओपनहायमर; यंदा 'ऑस्कर'च्या शर्यतीत कोणते चित्रपट? पाहा संपूर्ण यादी