Om Puri : अभिनेते ओम पुरी (Om Puri) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने खूप प्रसिद्धी कमावली. ओम पुरींनी त्यांच्या वेगवेगळ्या पात्रांनी मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली. त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. परंतु, त्यांचे शालेय शिक्षण पटियाला येथून झाले. बालपणी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. उदरनिर्वाहासाठी त्यांनाही काम करावे लागत होते.
आयुष्यात अनेक संघर्ष करत असतानाच त्यांनी इंडस्ट्रीत मोठं स्थान मिळवलं आणि मेथड अॅक्टिंगचे ते चालते बोलते विद्यापीठ म्हणून ओळखले गेले. ओम पुरी यांचे सुरुवातीचे जीवन संघर्षमय होते. आपल्या जीवनातील किस्से ते स्वतः चाहत्यांसोबत शेअर करायचे. असे किस्से सांगताना ते अनेकवेळा भावूक व्हायचे. एकदा अनुपम खेर यांच्या शोमध्ये त्यांनी सांगितले होते की, वयाच्या 6व्या वर्षी घरगाडा चालवण्यासाठी चहाचे ग्लास धुत असत. त्यांचे बालपण खूप गरिबीत गेले आणि अनेक संघर्षानंतर त्यांना यश मिळाले.
मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात
ओम पुरी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटातून केली होती. 1983मध्ये आलेल्या ‘अर्ध सत्य’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. घरची परिस्थिती खराब असल्याने ओम पुरी वयाच्या 6व्या वर्षी चहाच्या स्टॉलवर चहाची भांडी साफ करायचे. पण, अभिनयाची आवड त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत घेऊन गेली. 1988 मध्ये, ओम पुरी यांनी दूरदर्शनच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका 'भारत एक खोज' मध्ये अनेक भूमिका साकारल्या, ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नसीरुद्दीन शाहंनी केली मदत
बॉलिवूडच नव्हे तर, हॉलिवूडमध्येही अभिनय करणाऱ्या ओम पुरींचे इंग्रजी फारसे चांगले नव्हते. त्याची हिंदीही फारशी चांगली नव्हती. याचे कारण म्हणजे, त्यांचे शिक्षण पंजाबी भाषेत झाले होते. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेतला तरी, त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे, एका क्षणी त्यांनी ठरवले होते की, आपण यापुढे अभिनय करणार नाही. ओम पुरी आपल्या टॅलेंटमुळे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत पोहोचले होते, पण इथेही गरिबी त्यांची साथ सोडत नव्हती. नसीरुद्दीन शाह त्या काळात त्यांचे चांगले मित्र बनले. स्वतः ओम पुरी यांनी अनेकवेळा कबूल केले आहे की, नसीरने त्यांना मदत केली नसती तर तो कधीच इथपर्यंत पोहचू शकले नसते.
राष्ट्रीय पुरस्कारावर कोरले नाव!
'मिर्च मसाला', 'जाने भी दो यारो', 'आंटी 420', 'हेरा फेरी', 'मालामाल विकली' यांसारख्या अनेक चित्रपटांत ते वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये झळकले. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘अर्धसत्य’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा :