Nitin Desai Last Rituals : लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण ज्या नितीन देसाईंनी आपल्या प्रतिभेनं अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांची फ्रेम न फ्रेम जिवंत केली, त्या हिंदी सिनेमांच्या दुनियेतल्या आमिर खान (Aamir Khan), आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar), मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्याखेरीज एकही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित नव्हता. 


बॉलिवूडला भव्यतेचं कोंदण देणाऱ्या, सिनेमाच्या पडद्याला श्रीमंत आणि भरजरी बनवणाऱ्या नितीन देसाईंचा बॉलिवूडला इतक्या लवकर विसर पडलाय का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. आधीच बॉलिवूडनं देसाईंना बॉयकॉट केल्याचा आरोप होतोय. त्यापाठोपाठ आता नितीन चंद्रकांत देसाईंना अखेरचा निरोप देण्यासाठीही बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 


सिनेमातील निर्जीव वस्तूंमध्ये प्राण भरणारे एनडी अर्थात नितीन देसाई मनोरंजन विश्वातील 'आधुनिक विश्वकर्मा' अशी त्यांची ओळख. सिनेमांचे सुंदर सेट तर त्यांनी उभारले पण आयुष्याचा अत्यंत सुंदर सेट मात्र त्यांनी उद्ध्वस्त केला. शनिवार वाडा असो किंवा शीश महल, छोट्याशा गावाची निर्मिती असो किंवा मोठ मोठे महल एनडी स्टुडिओतल्या (ND Studio) या सगळ्या वास्तूंमध्ये नितीन देसाई दिसत होते. जिथे एरवी शूटिंगची धावपळ असायची, जिथे आज गर्दी होती ती शेवटचा निरोप देण्यासाठी. जो जोधा अकबरचा सेट त्यांनी मोठ्या कष्टाने उभारला त्याच सेटवर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. 


नितीन देसाईंबाबत बॉलिवूडचा कृतघ्नपणा


'देवदास','जोधा अकबर','हम दिल दे चुके सनम','लगान','प्रेम रतन धन पायो','फॅशन','ट्राफिक सिग्नल' अशा अनेक सिनेमांना नितीन देसाई यांनी आपल्या सेटमधून जीवंत रुप दिलं आहे. सिनेमाच्या यशात त्यांचा नेहमीच मोलाचा वाटा असायचा. सिनेमाचा सेट तयार करण्यापासून ते शूटिंगचं पॅकअप करेपर्यंत देसाई सेटवर उपस्थित असायचे. पण आज त्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांच्यासोबत बॉलिवूड नसल्याचं दिसलं. कुठे आहे 'देवदास'मधला शाहरुख खान? कुठे आहे 'हम दिल दे चुके सनम'मधला सलमान खान? कुठे आहे 'जोधा अकबर'मधला ऋतिक रोशन? कुठे आहे कपूर परिवार? ज्या देसाईंनी सिनेमाच्या पडद्याला चार चाँद लावले, बॉलिवूडला भरजरी श्रीमंती दिली त्याच नितीन देसाईंबाबत बॉलिवूडकरांची दिसलेली संवेदनशीलतेची गरिबी याला कृतघ्नपणा म्हणावा की दुर्दैव.


नितीन देसाईंच्या निधनावर शोक व्यक्त करत आमिर खान (Aamir Khan ON Nitin Desai) म्हणाला,"नितीन देसाईंची आत्महत्या ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं हे मला समजू शकलेलं नाही. यागोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. त्यांनी मदत मागायला हवी होती. पण हे खूप वाईट आहे. आम्ही एक अतिशय प्रतिभावन व्यक्ती गमावली आहे.






संबंधित बातम्या


Nitin Desai Last Rituals : आयुष्याच्या सेटवरुन एक्झिट! नितीन देसाई अनंतात विलीन; एन.डी. स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार