Nitin Desai : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. एडलवाईज कंपनीवर याप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान "माझ्या वडिलांनी कोणालाच फसवलेलं नाही", अशी प्रतिक्रिया नितीन देसाई यांची लेक मानसी देसाईने दिली आहे. 


नितीन देसाईंच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया 


नितीन देसाईंची मुलगी मानसी म्हणाली,"माझ्या वडिलांनी कोणालाही फसवलेलं नाही. त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे पैसे थकले. तसेच एडलवाईज कंपनीने वडिलांना खोटी आशा दाखवली, माझ्या वडिलांनी खूप मेहनत करुन त्यांचं नाव कमावलं आहे ते मातीत मिळवू नका, असं वक्तव्य मानसी देसाईने केलं आहे.


देसाईंना एडलवाईजने फसवलं?


नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आता एडलवाईज कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड पोलिसांनी एडलवाईज कंपनीला नोटीस बजावली आहे. तसेच देसाईंबाबतच्या कर्जासंदर्भात कागदपत्र घेऊन हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशीदरम्यान जर काही उघडकीस आलं तर पुढे कारवाई करण्यात येईल. 


नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय?


कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्याचा तपशील आता समोर आला आहे. एडेलवाईज कंपनीचे अध्यक्ष रशेष शाह आणि अन्य तीन जणांवर देसाईंनी गंभीर आरोप केले आहेत. रशेष शाहनं माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं, स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटला, असं देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. या सगळ्याचा तपास खालापूर पोलीस सध्या करत आहेत. 


आमची कृती कायदेशीरच : एडलवाईज


एडलवाईज फायनान्स या कंपनीनं आपली बाजू स्टॉक एक्सचेंजच्या फायलिंगमध्ये स्पष्ट केली आहे. एडलवाईजचे अधिकारी चौकशी प्रक्रियेला संपूर्ण सहकार्य करणार आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी असं आपलंही मत आहे, असं एडलवाईसनं म्हटलं आहे. आमच्या सर्व कृती या कायदेशीर होत्या हे चौकशीतून समोर येईल, असा दावाही कंपनीनं केला आहे.


नितीन देसाई यांच्या  आत्महत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडून ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात त्या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पाचजणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.



संबंधित बातम्या