Nikamma Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) चित्रपट 'निकम्मा' (Nikamma) 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात कमी पडला, असे वाटते आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने निराशा केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटीचीही कमाई केलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडलेला नसल्याचे दिसते आहे.


‘निकम्मा’ या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मोठ्या पडद्यावर कमबॅक केले आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसह अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 2022 या वर्षातील हा सातवा चित्रपट आहे, ज्याने 1 कोटींपेक्षा कमी व्यवसाय केला आहे.


अवघी इतकी कमाई!


मीडिया रिपोर्टनुसार, तब्बल 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'निकम्मा' चित्रपटाच्या केवळ प्रमोशनवर पाच कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. हा चित्रपट शुक्रवारी सुमारे 1250 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनच्या खर्चाच्या किमान 10 टक्के कलेक्शन झाले असते, तर 'निकम्मा' चित्रपटाची ओपनिंग चांगली मानता आली असती. परंतु, चित्रपटाने पहिल्या दिवशी एक कोटी रुपयांचाही व्यवसाय केलेला नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, 'निकम्मा' चित्रपटाने देशभरात रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ 51 लाख रुपयांची कमाई केली आहे.



काय आहे कथानक?


अभिमन्यु दसानी याच्या आयुष्यात जेव्हा शिल्पाची एन्ट्री होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतात? तो कसा बदलतो? हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. शिल्पा ही या चित्रपटामध्ये सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दासानी यांच्यासोबतच शर्ली सेटीया, सुनील ग्रोवर आणि समीर सोनी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. शर्ली आणि अभिमन्यु यांचा रोमँटिक अंदाज या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.


'निकम्मा' हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार होता. पण, कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'मिडल क्लास अब्बाई' या तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे. सब्बीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. अभिमन्यु दसानी हा अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा आहे. त्यानं 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.


हेही वाचा :