मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी मे महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांनी घाई-गडबडीत विवाहसोहळा आटपल्यामुळे उपस्थित केल्या गेलेल्या शंका खऱ्या ठरण्याची शक्यता आहे.
नेहा प्रेग्नंट असल्यामुळे दोघांनी लग्न उरकल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अंगद बेदीसह नेहा धुपियाच्या वडिलांनी ही 'चर्चा' धुडकावून लावली. मात्र नेहा धुपिया गर्भवती असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.
लग्नानंतर जाहीर कार्यक्रमांना नेहाने परिधान केलेले लूज कपडे हे प्रेग्नन्सीचं लक्षण असल्याचं चाणाक्ष चाहते मानतात. योग्य मुहूर्त पाहून अंगद आणि नेहा आपल्या बाळाच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आपलं लग्न खाजगी सोहळा असावा, अशी आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही फारसा गाजावाजा न करता लग्न केल्याचं अंगदने सांगितलं होतं.
'नेहा लग्नाआधी गरोदर असल्याच्या वृत्तात जरासंही तथ्य नाही. कामाच्या डोंगरामुळे नेहा आणि अंगद यांना लग्नासाठी फार वेळ देता येत नव्हता. त्यामुळे घाई गडबडीत तारीख ठरवून दोघांचं शुभमंगल पार पाडलं.' असं नेहाचे वडील प्रदीप धुपिया म्हणाले होते.
नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी 10 मे रोजी दिल्लीत विवाहबंधनात अडकले होते. अंगद आणि नेहाने शीख पद्धतीने विवाह केला.
नेहा धुपिया 37 वर्षांची आहे, तर अंगद तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान म्हणजेच 35 वर्षांचा आहे. यामुळेच सोशल मीडियावर दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं.
‘मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नेहा धुपिया 'तुम्हारी सुलू' चित्रपटानंतर मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. तर नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ती अखेरची दिसली.
अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. अंगद बेदीनेही काही चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक सिनेमात दिसला होता.