मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन संबंधी तपास करणाऱ्या NCB ने अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी सुरु केली होती. या दरम्यान NCB अशी शंका होती की अर्जुन रामपाल दक्षिण आफ्रिकेला पळून जाण्याची शक्यता आहे. म्हणून तशा आशयाचे एक पत्रही NCB ने दक्षिण आफ्रिकेच्या काऊन्सलेट जनरलला लिहिले होते. NCB च्या चार्जशीटमधून हा खुलासा झाला आहे.
अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी केल्यानंतर त्याच्या घरातून काही गोळ्या आणि इतर सामान NCB ने जप्त केलं होतं. त्यानंतर त्याची चौकशीही करण्यात आली होती. या दरम्यान, अर्जुन रामपाल भारत सोडून दक्षिण आफ्रिकेला पसार होण्याची शक्यता NCB ला होती. NCB बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत असून अजूनही अर्जुन NCB च्या रडारवर आहे.
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 13 नोव्हेंबरला बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची सात तास चौकशी केली होती. ही चौकशी सुरु असताना अर्जुन रामपालचा विदेशी मित्र पॉल गियर्डला अटक करण्यात आली होती. त्या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रायडिसची सलग दोन दिवस चौकशी केली होती.
कोणत्याही निर्दोष व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळवणे ही वाईट गोष्ट आहे. माझे या ड्रग्ज प्रकरणाशी कोणतेही देणे-घेणे नाही. परंतु या प्रकरणासंबंधी एनसीबी जे काम करत आहे ते योग्य आहे असा दावा एनसीबीच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालने केला होता. माझ्या घरात जे औषध एनसीबीला मिळाले आहे त्याचे प्रिस्कीप्शन माझ्याकडे आहे आणि ते मी एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. या प्रकरणासंबंधीच्या तपासाला माझे पूर्ण सहकार्य आहे असंही त्याने स्पष्ट केलं होतं.
एनसीबीने अर्जुन रामपालच्या बांद्रातील घराची झडती घेतली होती. त्यात एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता. त्यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रायडिसला चौकशीची नोटीस देण्यात आली होती.
अनेक तासांच्या छाप्यात एनसीबीला त्याच्या घरात दोन प्रकारच्या टॅबलेट्स सापडल्या. पहिल्या गोळीचं नाव 'ULTRACET'होतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच ही गोळी घेता येते. ही गोळी 'TRAMADOL' (ISIS ड्रग्ज नावानेही ओळखलं जातं ) आणि ACETAMINOPH दोन प्रकारच्या ड्रग्जने बनवली जाते. 'ULTFACET' च्या एका पॅकेटमध्ये एकूण 15 गोळ्या असतात. एनसीबीला त्या पॅकेटमध्ये उरलेल्या चारच गोळ्या सापडल्या होत्या. दुसरी टॅबलेट जी अर्जुन रामपालच्या घरातून जप्त करण्यात आली होती तिचं नाव 'CLONAZEPAM' आहे. ही गोळी पॅनिक अटॅक आणि एन्झायटीच्या समस्येवर घेतली जाते. एनसीबीला या गोळीचे दोन पॅकेट्स सापडले होते.
या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुत्र्याची वेदनाशामक औषधं आणि बिहिणीची एन्झायटीची औषधं जप्त केली होती, असं अर्जुन रामपालने सांगितलं होतं.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलवूडचे ड्रग्ज संबंध चव्हाट्यावर आले होते. त्यासंबंधी एनसीबी तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या :