Nayanthara-Vignesh Shivan : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि तिचा पती विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी सरोगसीचे कोणतेही नियम मोडलेले नाहीत, असे म्हणत तामिळनाडू सरकारने या जोडीला क्लीनचीट दिली आहे. साऊथची ही प्रसिद्ध जोडी लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच दोन मुलांची पालक झाली. ही बातमी समोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. अनेकांनी ही सरोगेसी नियमबाह्य असल्याचा दावा केला होता. दोघांनी सरोगसीचे नियम मोडल्याचे म्हटले जात होते. याप्रकरणी विरोध वाढत असताना, तामिळनाडू सरकारने देखील तीन सदस्यांचे पॅनेल तयार केले आणि या प्रकरणी त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.  


मात्र, आता समोर आलेल्या अहवालात राज्य सरकारच्या पथकाकडून असा दावा केला जात आहे की, दोघांनी कोणतेही नियम मोडले नाहीत. इतकेच नाही, तर तामिळनाडू राज्य सरकारच्या पथकाने अहवालात सरोगसी प्रक्रिया पार पडलेल्या रुग्णालयावर नियम मोडल्याचा आरोप लावला आहे. या स्टार जोडप्याने कोणताही कायदा मोडला नसल्याचे पॅनेलचे म्हणणे आहे. त्यांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन केलेले नाही. मात्र, सरोगसी करणाऱ्या रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.


कोणताही नियम मोडला नसल्याचा निर्वाळा


या पथकाने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, सरोगेट आईने नोव्हेंबर 2021मध्येच नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेशसोबत (Vignesh Shivan) करार केला होता. या करारानुसार या वर्षी मार्चमध्ये ही सरोगेसी प्रकिया पार पडली आणि ऑक्टोबरमध्ये त्यांच्या बाळांचा जन्म झाला. सरोगसी रेग्युलेशन अॅक्ट 2021 अंतर्गत भारतात व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, हा नियम यावर्षीच लागू झाला. म्हणजेच नयनतारा आणि विग्नेश यांनी ही प्रक्रिया सुरू केली, तेव्हा भारतात ती पूर्णपणे कायदेशीर होती. तर, ही प्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयानेच अनेक गोष्टींमध्ये त्रुटी ठेवल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. यानंतर आता संबंधित रुग्णालयाला देखील नोटिस पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.


व्यावसायिक सरोगसीवर बंदी


डिसेंबर 2021मध्ये देशभरात ‘सरोगसी कायदा 2021’ मंजूर झाला आणि 25 जानेवारी 2022पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली. या कायद्या अंतर्गत व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती, केवळ परोपकारी सरोगसीला परवानगी होती. ‘परोपकारी सरोगसी’ म्हणजे ज्यामध्ये सरोगेट आई पैसे घेणार नाही, फक्त तिला याचा वैद्यकीय खर्च आणि जीवन विमा द्याव लागतो.


हेही वाचा :


Nayanthara-Vignesh’s Babies : नयनतारा अन् विग्नेश झाले ‘अम्मा-आप्पा’, अभिनेत्रीच्या घरी जुळ्यांचं आगमन!