Har Har Mahadev : अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील चित्रपट म्हटलं की, प्रेक्षक अशा चित्रपटांना डोक्यावर उचलून घेतात. नुकताच अभिनेता सुबोध भावे यांचा ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवरही आपली जादू दाखवली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.


‘हर हर महादेव’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 2.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. निर्मात्यांनी स्वतः ही चांगली बातमी चाहत्यांसोबत शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘स्वराज्याच्या सुवर्णगाथेला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद’, असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.


पाहा पोस्ट :


 






महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.


एक-दोन नव्हे तब्बल 5 भाषांमध्ये चित्रपट रिलीज!


मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानेही असाच एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळाला आहे. 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा चित्रपट फक्त मराठीतच नाही, तर तब्बल पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांमधून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट खास दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


'हर हर महादेव'मध्ये कलाकारांची मांदियाळी


'हर हर महादेव' या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 25 ऑक्टोबरपासून 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा 'हर हर महादेव' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 27 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!