मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने पती नवाजुद्दीनला कायदेशीर नोटीस पाठवून तलाक मागितला आहे. आलिया हिने स्वतः एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. याच महिन्यात 7 मे रोजी आलियाने नवाजुद्दीन तलाक साठीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या कायदेशीर नोटीसमध्ये तलाक सोबत मेन्टनसची देखील मागणी करण्यात आली आहे. मेन्टनसमध्ये कोणत्या गोष्टींची मागणी केली. कोणत्या अटी-शर्ती नवाजुद्दीन समोर ठेवल्या याविषयी आलियाने कोणतीही माहिती सांगितली नाही. योग्य वेळी सर्व काही सांगणार असल्याचं ती म्हणाली.
विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच तिने आपले नाव कायदेशीररित्या अंजना आनंद किशोर पांडे असे ठेवले असल्याची माहितीही आलियाने एबीपी न्यूजला दिली. आलियाला अंजली आणि अंजना या दोन्ही नावांनी ओळखले जाते. तिच्या वडिलांचे नाव आनंद किशोर पांडे आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत. 2009 साली या दोघांनी प्रेम विवाह केला होते, त्यानंतर अंजना उर्फ अंजलीने आपले नाव बदलून आलिया केले.
आलिया ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी नवाजने नैनीताल जवळील हल्दवानी येथे राहणाऱ्या शीबा नावाच्या मुलीशी लग्न केले होते. नवाजने शीबाशी त्याच्या आईच्या निवडीनुसार लग्न केले होते. मात्र, हे लग्न सहा महिनेही टिकलं नाही. लवकरच दोघांच्यात घटस्फोट झाला. या लग्नाला ब्रेक लागल्यानंतर सहा महिन्यांनंतर नवाजने त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंजली उर्फ अंजनाशी लग्न केले.
एबीपी न्यूजने नवाजुद्दीन सिद्दीकीपासून घटस्फोट घेण्यामागील कारणांबद्दल विचारले असता, आलिया म्हणाली, याला एक कारण नाही. आमच्यात खूप गोष्टींवरुन वाद आहे. "नवाझ आणि माझ्या लग्नाच्या एका वर्षापासून म्हणजे 2010 पासून आमच्यात बिनसायला सुरुवात झाली. पण, मी नेहमी समजून घेतलं. मात्र, आता पाणी डोक्याच्या वर गेलं असल्याचं आलिया म्हणाले.
मुंबईहून यूपीतील मूळगावी पोहोचताच नवाजुद्दीन सिद्दीकी होम क्वॉरन्टाईन!
नवाजुद्दीन आणि आलियाचे अफेअर 2004 मध्ये सुरू झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये वारंवार झालेल्या वादामुळे लग्नाआधीच ब्रेक-अप आणि पॅच-अप देखील झाले होते. याचा उल्लेख नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आत्मचरित्र 'अॅन ऑडिनेरी लाइफ - ए मेमॉर' मध्ये विस्ताराने केला आहे. विशेष म्हणजे, तलाक घ्यायला जाणाऱ्या आलिया आणि नवाज हे दोन मुलांचे पालक आहेत. दोघांना नऊ वर्षाची मुलगी असून त्यांचे नाव शौरा सिद्दीकी आहे, तर त्यांच्या पाच वर्षाच्या मुलाचे नाव यानी सिद्दीकी आहे.
एबीपी न्यूजने आलियाचे वकील भाविन सहाय यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, “लॉकडाऊनमुळे आम्ही नवाजला पोस्टामार्फत नोटीस देऊ शकलो नाही, परंतु आम्ही त्यांना ई-मेल आणि व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठविली आहे. "आम्ही या नवाजच्या उत्तराची वाट पाहत आहोत. लॉकडाऊननंतर आम्ही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल करू, अशी माहिती भाविन यांनी दिली.
या संपूर्ण विषयावर आम्ही नवाजुद्दीन सिद्दीकी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण बातमी लिहिण्यापर्यंत आम्हाला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 10 मे रोजी नवाज आपल्या आजारी आईसह मुंबईहून उत्तर प्रदेशातील वडिलोपार्जित गावी बुधाणा येथे गेला आहे. त्यांना घरातचं क्वॉरंटाईन करण्यात आलंय.
Ghaziabad Migrant Worker | गाझियाबादमध्ये श्रमिक ट्रेनसाठी मजुरांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा