मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट 'कोर्ट'मध्ये नारायण कांबळे ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन झालं. नागपूरच्या एम्समध्ये मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने वीरा साथीदार यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


'कोर्ट' चित्रपटाचे दिग्दर्शक ताम्हणे यांनी सांगितलं की, "कोरोनामुळे त्यांचं निधन झाल्याचं वृत्त मला काही वेळापूर्वीच समजलं. ही बातमी समजल्यावर मला धक्का बसला. मला विश्वास बसत नाही. साथीदार अतिशय उत्तम व्यक्ती होते. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की कोर्ट चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली."


वीरा साथीदार याचा वावर केवळ अभिनयापुरताच मर्यादित नव्हता. लेखक, कवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांचं बालपण अतिशय हालाखीत गेलं. मूळचे वर्धा जिल्ह्यातील असलेल्या वीरा साथीदार यांच बालपण नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत गेलं. त्यांचे वडील कुली म्हणून काम करत होते तर आई मजुरीचं काम करत होती.


वीरा साथीदार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी अतिशय प्रभावित होते. अशातच त्यानी दलित आणि मागासवर्गीयांमध्ये चेतना जागृत करण्यासाठी अनेक गीत रचली आणि गायली. 'विद्रोही' नावाच्या मासिकाचे संपादन केले. 'रिपब्लिकन पँथर' संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.


विशेष म्हणजे 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कोर्ट' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, परदेशी भाषा चित्रपट श्रेणीत भारताकडून तो ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता.