मुंबई : 'नमस्ते दर्शको...', असं म्हणत बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिनं पुन्हा एकदा तिचा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. इथं सारा निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या आणि सृष्टीसौंदर्याचा खजिना असणाऱ्या काश्मीर सफरीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे.
सारानं नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती आणि तिची आई, अभिनेत्री अमृता सिंह या गुलमर्गमध्ये एके ठिकाणी रोप वेनं जाताना दिसत आहेत. सहसा रोप वेनं जात असतानाच आजुबाजूचं निसर्गसौंदर्य न्याहाळण्याकडेच अनेकांचा कल दिसतो. पण, अमृता सिंह मात्र या मनस्थितीत नव्हती.
भीतीपोटी तिनं डोळेच मिटून घेतले होते, हे पाहून सारानं अतिशय विनोदी अंदाजाच आपल्या आईची भीती पळवण्यासाठी आणि त्या प्रसंगाला आणखी मजेशीर करण्यासाठी तिचीच कॉमेंट्री सुरु केली. इतकंच नव्हे, तर रोप वे मधून उतरल्यानंतर सारा एका बर्फाच्छादित प्रदेशात पोहोचली जिथली दृश्य पाहून तुम्हालाही एकदातरी या भागाला भेट द्यावंसं वाटेल.
Deepika Padukone | दीपिका पदुकोणकडून महत्त्वपूर्ण पदाचा त्याग, दिलं 'हे' कारण...
साराच्या या चारोळ्या आणि तिचा हाच अंदाज सोशल मीडियावर आणि कलाविश्वातही तिच्या चाहत्यांमध्ये दिवसागणिक आणखी भर टाकण्यास कारणीभूत ठरत आहे. सध्या बी-टाऊनची ही युवा सौंदर्यवती तिच्या कुटुंबासह सुट्टीवर गेली आहे. इन्स्टाग्रामवर मागील काही दिवसांमध्ये तिनं पोस्ट केलेले फोटो पाहता सारा सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
कोरोना काळातील निर्बंध आणि चित्रपटाच्या चित्रीकरण, प्रसिद्धीचं व्यग्र वेळापत्रक या साऱ्या धकाधकीतून वेळ काढत सारा कायमच तिच्या कुटुंबाला प्राधान्य देताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिनं मालदिवलाही भेट दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून सारा तिच्या जीवनातील या क्षणांमध्ये चाहत्यांनाही समाविष्ट करुन घेताना दिसते.