Kastoori Movie Release Date : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी' (Kastoori) या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आधी हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. अद्याप या सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आलेली नाही. 'कस्तुरी' या सिनेमाची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. पण आता प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
'या' कारणाने 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर
'कस्तुरी' या सिनेमाच्या निर्मात्या पायल ढोके यांनी सकाळल्या दिलेल्या मुलाखतीत 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर गेल्याचं जाहीर केलं आहे. पायल म्हणाल्या,"तांत्रिक अडचणी आल्याने 'कस्तुरी' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. लवकरच सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात येईल".
'कस्तुरी' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा विनोद कांबळे (Vinod Kamble) यांनी सांभाळली आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. या सिनेमातील कलाकार आणि दिग्दर्शक यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.
पहिला सिनेमा असूनही त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येही हा सिनेमा निवडला गेला आहे. 'कस्तुरी' हा सिनेमा प्रेक्षकांना भावला असून सर्वत्र त्याचं खूप कौतुक करण्यात आलं आहे.
सत्यघटनेवर आधारित 'कस्तुरी'
'कस्तुरी' हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. सनी चव्हाण नामक एका पोस्टमार्टम करणाऱ्या मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून कस्तुरीच्या अत्तराचा शोध घेणाऱ्या दोन मित्रांची धडपड या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आर्थिक व सामाजिक कारणामुळे शाळकरी मुलं शिक्षणापासून कशी वंचित राहतात हे या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. अनेक नवोदित कलाकारांची फळी या सिनेमात आहे. समर्थ सोनवणे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
संबंधित बातम्या