Naseeruddin Shah :  रुपेरी पडद्यावर आणि रंगभूमीवर जेवढा दमदार अभिनय तेवढच्या स्पष्टपणे आपली सडेतोड मते व्यक्त करण्यासाठी अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या दर्जेदार चित्रपट निर्माण होणे बंद झाले असल्याने आपण चित्रपट पाहत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तर, दुसरीकडे त्यांनी गंभीर आशयाचे, वास्तवदर्शी चित्रपट करणाऱ्यांनी सध्या समाजातील गंभीर परिस्थिती मांडावी. पण, तुमच्या विरोधात कोणताही फतवा अथवा तुमच्या दरवाजावर ईडीची (ED) टकटक होऊ नये अशा पद्धतीने चित्रपट निर्मिती करण्याचा सल्ला शाह यांनी दिला. 


'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत बॉलिवूड चित्रपटांबाबत भाष्य केले. हिंदी चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याचा अभिमान वाटतो. पण सध्या चित्रपट निर्माते असेच एकसारख्या विषयांभोवती चित्रपट बनवत आले आहेत. ही गोष्ट निराशाजनक वाटत असून मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केले असल्याचे शाह यांनी म्हटले. 


शाह यांनी म्हटले की, निर्मात्यांनी फक्त पैसाच कमावण्याचे साधन म्हणून चित्रपटांकडे पाहणे सोडले तर बॉलिवूडच्या भवितव्याबद्दल सकारात्मक राहता येईल. पण, सध्या उशीर झाला असल्याचे त्यांनी म्हटले. काही गंभीर विषय मांडणारे चित्रपट सध्या काही हजार प्रेक्षक पाहतात, असे काही चित्रपट येतील आणि हा प्रेक्षक वर्ग पाहिल. पण, हे किती काळ चालेल याची कल्पना नाही असेही  शाह यांनी म्हटले. 


तुमच्या दरवाजावर ईडीची टकटक होऊ नये...


नसिरुद्दीन शाह यांनी म्हटले की, गंभीर विषयांवर चित्रपट करणाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी सध्याची वास्तविकता चित्रपटातून मांडावी आणि अशा पद्धतीने मांडावी की तुमच्याविरोधात कोणी फतवा काढता कामा नये अशा पद्धतीने चित्रपट काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. इराणी चित्रपट निर्मात्यांनी अधिकाऱ्यांच्या दडपशाहीला न जुमानता चित्रपट बनवले आणि भारतीय व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण आणीबाणीच्या काळात व्यंगचित्रातून परिस्थिती मांडत होते, याची आठवण भारतीय चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना करून दिली. 


हिंदी सिनेमांत दम का नाही? नसीरुद्दीन शाह यांचा सवाल


नसीरुद्दीन शाह म्हणाले,"हिंदी सिनेमे पाहणं मी बंद केलं आहे. सध्याचे बॉलिवूडपट मला अजिबात आवडत नाहीत. हिंदुस्तानी जेवण जगभरात पसंत केलं जातं कारण त्यात दम आहे. पण मग हिंदी सिनेमांत हा दम का दिसत नाही? जगभरातील भारतीय हिंदी सिनेमे पाहायला पसंती दर्शवतात. कारण हे सिनेमे कुटुंबासोबत जोडलेले असतात. पण येत्या दिवसांत हे चित्र बदलू शकतं".