Khashaba movie: दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सध्या त्यांच्या खाशाबा या आगामी चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाची कथा खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. आटपाट प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकताच एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये खाशाबा या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाची खास झलक दाखवण्यात आली आहे.
'खाशाबा' च्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाची खास झलक
आटपाट प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चित्रपटाच्या शूटिंग सेटवर लगबग सुरु आहे. नागराज मंजुळे हे सगळ्यांना इंस्ट्रक्शन्स देताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काही पैलवान कुस्ती खेळताना देखील दिसत आहेत.
खाशाबा या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाच्या व्हिडीओमध्ये नागराज मंजुळे म्हणतात, "खाशाबाच्या शूटिंगचा हा पहिला दिवस आहे. खाशाबा जाधव हे आपल्या मराठी मातीतले नायक आहेत.भारताला आणि महाराष्ट्राला जगात त्यांनी नाव मिळवून दिलं. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही या चित्रपटाची तयारी करत आहोत. मी खूप उत्सुक आहे. दिग्दर्शन करायला मजा येत आहे. खूप चांगली टीम आहे.आशा आहे की, सगळं चांगलं होईल. थोडी उत्सुकता आहे आणि थोडी भिती आहे. चांगभलं!"
आटपाट प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "खाशाबाच्या नावानं चांगभलं ! मराठी मातीत जन्म घेऊन जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरणाऱ्या, झुंजार नायकाची गोष्ट, ‘खाशाबा!’ जिओ स्टुडिओज निर्मित आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसाची ही एक झलक!"
पाहा व्हिडीओ:
आता खाशाबा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. "फॅन्ड्री', 'सैराट'नंतर 'खाशाबा' हा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला तिसरा मराठी चित्रपट आहे.
संबंधित बातम्या:
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंनी शेअर केली 'खाशाबा'ची पहिली झलक