Nagraj Manjule : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी पैववान राहिलेल्या खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून नागराज यांनी ही घोषणा केली आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे. 


कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव (Khashaba Jadhav Movie) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय नागराज मंजुळे यांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली. 


आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून गीता आणि बबिता फोगाट यांच्या कुस्तीचा सुवर्णप्रवास दाखवण्यात आला होता. आता गावच्या लाल मातीत खेळलेला आणि देशासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला मराठी माणूस म्हणजेच, खाशाबा जाधव यांचं आयुष्य रुपेरी पडद्याच्या माध्यमातून जगासमोर यावं यासाठी नागराज मंजुळे हा सिनेमा बनवणार आहेत. 


नागराज मंजुळे म्हणाले, "खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच मी यासंदर्भात माहिती देईल. या सिनेमाचं शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकतं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे". 


खाशाबा जाधव यांच्याबद्दल जाणून घ्या...


खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही. भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. 


नागराज मंजुळे (Nagraj manjule) यांचा 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Bandook Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत आहेत. येत्या 7 एप्रिलला हा सिनेमा मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ghar Bandook Biryani : "आशेच्या भांगेची नशा भारी"; नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिरयानी'ची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला