Mujya OTT Release : सध्या बॉक्स ऑफिसवर अॅक्शनपटाऐवजी हॉररपटाची चलती आहे. स्त्री, शैतान नंतर 'मुंज्या'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'मुंज्या' (Munjya) रिलीज होऊन दोन आठवडे झाले असून दोन्ही आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 


रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडमध्येही 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी या 'मुंज्या'ने चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या 17 व्या दिवसापर्यंत मुंज्याने भारतातील बॉक्स ऑफिसवर 82 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 


मुंज्या कधी आणि कुठे रिलीज होणार? Mujya OTT Release 



मुंज्या हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला कमाई करत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या दोन महिन्यांनी मुंज्या ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मुंज्या हा ऑगस्टमध्ये ओटीटीवर रिलीज होणार आहे.  हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे.  मात्र, याबाबत निर्मात्यांनी किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. 


'चंदू चॅम्पियन'ला देखील मागे सोडले...


शर्वरी आणि अभयच्या या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'ला मागे सारले आहे. 'मुंज्या'ला चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर 'चंदू चॅम्पियन'चा कस लागत आहे. बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनचा विचार करता चंदू चॅम्पियनपेक्षा मुंज्या सरस ठरला आहे. 'मुंज्या' लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होईल अशी शक्यता आहे. 


‘मुंज्या’ ने दिली मोठ्या चित्रपटांना मात...


 फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मुंज्या’ ने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. या चित्रपटाने 350 कोटींचे बजेट असलेली  ‘बड़े मियां छोटे मिया’  आणि 200 कोटींचा बजेट असलेल्या अजय देवगणची भूमिका असलेल्या मैदान चित्रपटाला मात दिली आहे.  ‘बड़े मियां छोटे मिया’ ने बॉक्स ऑफिसवर 65 कोटींची कमाई केली. तर, 'मैदान'ने 52 कोटींची कमाई केली होती. 


'मुंज्या'ला 100 कोटी क्लबचे वेध


'मुंज्या' चित्रपटाची निर्मिती 30 कोटी रुपयांच्या आसपास झाली. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात आपल्या बजेटचा आकडा पार केला. चित्रपटाने आता बजेटच्या दुप्पट कमाई करत 80 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता 'मुंज्या' हा 100 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या क्लबमध्ये सहभागी होईल  का, याकडे सिनेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.