मुंबई : मॉडेल, अभिनेत्री पायल घोषने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी त्याबद्दलची कारवाई सुरु केली आहे. पायलने तक्रार दाखल केल्यानंतर अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता त्याला मुंबई पोलिसांसमोर हजर रहावं लागणार आहे.


पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. आपल्याला अनुरागने घरी बोलावलं असताना असभ्य वर्तन केलं. आपल्याशी बोलतानाही त्याने अनेक इतर मुलींची उदाहरणं दिली. आपलं लैंगिक शोषण झालं असून आपल्याला न्याय मिळावा, असं तिने या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर अनुराग कश्यपची पाठराखण करणाऱ्यांमध्येही वाढ झाली होती. अनुराग तसा नसून हा त्याला अडकवण्याचा प्राकर असल्याचं बोललं जातं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, राधिका आपटे आदी अनेक मुलींनी अनुराग तसा नसल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढानेही अनुराग बद्दल आपली काहीच तक्रार नसल्याचं म्हटलं आहे. पायलने दिलेल्या मुलाखतीत रिचाचा उल्लेख केला होता. त्यावर रिचाने तातडीने वकिलामार्फत स्पष्टीकरण देत पायलच्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचं सांगितलं होतं.





पाायल घोषने ही तक्रार दाखल केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी आपल्या जीवाला धोका असून आपल्याला वाय सिक्युरिटी मिळावी अशी मागणी तिने केली होती. पण अद्याप तिला ती सुरक्षा दिली आहे की, नाही ते अधिकृतरित्या कळलेल नाही. पायलने एकिकडे राज्यपालांची भेट घेतल्यानंतर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी आता आपली चौकशी यंत्रणा जलद केली आहे. अनुरागने मात्र यावर काहीही भाष्य केलेलं नाही. पायल घोषने हे आरोप केल्यानंतर आपल्याला अडकवण्यासाठी उचललेली ही पावलं आहेत. आणि माझ्या मित्रांनी यावर कोणतंही भाष्य न करण्याबद्दल सुचवलं आहे असं मात्र त्याने नमूद केलं होतं. आता उद्या चौकशीत काय समोर येतं ते पाहाणं मात्र कुतुहलाचं ठरेल.