मुंबई : 'इंदू सरकार' चित्रपटाला काँग्रेसने केलेला विरोध पाहून आमदार नितेश राणे यांनी स्वपक्षालाच टोला लगावला आहे. पत्रकार परिषद उधळून लावणे ही काँग्रेसची संस्कृती आहे का, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.


'काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद उधळून दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार चित्रपटाला विरोध केला, ही काँग्रेसची संस्कृती आहे का?' असा परखड सवाल विचारत काँग्रेसला घरचा आहेर दिला.

जेव्हा नारायण राणे विरोध करतात, तेव्हा टीका केली जाते, मग आता काँग्रेसच्या नेतृत्त्वाने दखल घेतली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसने पुणे, नागपुरात इंदू सरकारचं प्रमोशन होऊ दिलं नव्हतं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय मधुर भांडारकर यांनी घेतला होता.

काय आहे वाद?

या सर्व प्रकारानंतर मधुर भांडारकर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काही सवाल केले आहेत. पुण्यानंतर नागपुरातीलही पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असे सवाल राहुल गांधींना केले आहेत.

अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. नील नितीन मुकेश या सिनेमात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होईल.

संबंधित बातम्या :


काँग्रेसची गुंडगिरी तुमच्या परवानगीने? मधुर भांडारकर यांचा राहुल गांधींना सवाल


काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, नागपुरातील 'इंदू सरकार'चं प्रमोशन रद्द


इंदू सरकारचं पुण्यातील प्रमोशन काँग्रेसनं हाणून पाडलं