चेन्नई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तृप्ती भोईर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. दाक्षिणात्य संगीतकार टी सतीश चक्रवर्तीसोबत तिने लगीनगाठ बांधली. चेन्नईतील एव्हीएम मेना हॉलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
‘अगडबम’ या चित्रपटातील तृप्ती भोईरची नाजूका ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. अभिनेत्री आणि निर्माती असलेल्या तृप्तीने रंगमंचापासून टीव्ही आणि सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
सिनेमात येण्यापूर्वी तृप्ती रंगमंचावर अधिक सक्रीय होती. कॉलेजच्या दिवसात तिचा कल एकांकिका आणि नाटकांकडे होता. अभिनयाच्या जोरावर राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले होते. सही रे सही या नाटकातून तिला पहिला ब्रेक मिळाला. तृप्ती कायमच आपल्या भूमिकांमध्ये प्रयोग करत असते.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे’, ‘अगडबम’, ‘हॅलो जय हिंद’, ‘टुरिंग टॉकिज’ असे अनेक चित्रपट तृप्तीने दिग्दर्शित केल असून त्यापैकी काहींमध्ये अभिनयही केला आहे. याशिवाय ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्ये आणि ‘इंद्राक्षी’, ‘सही रे सही’ या नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.
तृप्ती भोईरचे पती टी सतीश चक्रवर्ती व्यवसायाने संगीतकार आहेत. त्यांनी तामीळमधील अनेक सिनेमांमध्ये संगीत दिलं आहे. लीलाई आणि कनिमोझी या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांनी 2006 पर्यंत संगीतकार ए आर रहमानसोबत काम केलं होतं.