Mumbai : मुंबईकरांसाठी लोकल (Mumbai Local) ही खूपच खास आहे. लोकलच्या डब्यात भजन गाण्यापासून ते अगदी भाजी साफ करण्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी प्रवासी करत असतात. आजच्या तरुण पिढीला रील बनवण्याचं खूप वेड आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुण मुलीने महिलांच्या डब्यात एक रील बनवलं आणि ते सोशल मीडियावर शेअर केलं. या व्हिडीओमध्ये त्या तरुणीसोबत होमगार्डही थिरकताना दिसत आहे. वर्दीमध्ये डान्स करणं होमगार्डला महागात पडलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
तरुणीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात
तरुणीला लोकल ट्रेनमध्ये रील बनवायची होती. रीलसाठी तिने महिलांच्या डब्यात डान्स करायला सुरुवात केली. तर तिची आई तिचा रील व्हिडीओ शूट करत होती. तरुणीने डान्स करायला सुरुवात केली तेव्हा एक होमगार्डही तिथे उभा होता. थोडावेळ तिचा डान्स पाहिल्यानंतर होमगार्डमधला डान्सर जागा झाला आणि त्यानेही तिच्यासोबत थिरकायला सुरुवात केली. पण वर्दीमध्ये तरुणीसोबत डान्स करणं होमगार्डला चांगलच महागात पडलं आहे.
मध्य रेल्वेच्या लोकलच्या द्वितीय श्रेमीच्या महिल्या डब्यात 6 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10.10 ते 10.15 च्या आसपास ही घटना घडली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात असलेल्या होम गार्डचं नाव एस.एफ, गुप्ता असं आहे. तरुणी तिच्या आईसोबत चिंचपोकळी ते सॅन्डहर्स्ट रोड असा प्रवास करत होती.
होमगार्डवर कारवाई
महिलांच्या डब्यात तरुणीसोबत डान्स करणे होमगार्डला महागात पडले आहे. लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपीने) कसुरी (डिफॉल्ट रिपोर्ट) अहवाल पाठवला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एस.एफ, गुप्ता या होम गार्डवर कारवाई करण्यात आली आहे.
लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) ट्वीट केलं आहे की,"6 डिसेंबर 2023 रोजी लोकल ट्रेन पेट्रोलिंग दरम्यान एक होमगार्ड गणवेशात नृत्य करत असल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहे. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पडताळून, संबंधित होमगार्ड यांच्यावर योग्यती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता दक्षता घेत आहोत".
संबंधित बातम्या