मुंबई : एका बॉडिबल्डरच्या आत्महत्येच्या प्रयत्नाप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता साहिल खानला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. साहिल खानविरोधात जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत नोंदवलेले दोन एफआयआर मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केले आहेत. मात्र, साहिल खानला एक लाख रुपयांचा दंड ठोठावत ही रक्कम महाराष्ट्र बालकल्याण समितीकडे जमा करण्याचे निर्देश दिले.


आएशा श्रॉफ आणि साहिल खान यांनी साल 2009 मध्ये एका सायबर सिक्युरिटी कंपनी आणि प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली होती. ते सोबत एक चित्रपटही बनवणार होते. पण तो प्रोजेक्ट गुंडाळला गेला आणि प्रोडक्शन हाऊसही बंद झाले. याप्रकरणी चार कोटी रुपयांची साहिलने फसवणूक केली असून व्यवसायासाठी म्हणून त्याने आपल्याकडून हे पैसे घेतले होते, असा आरोप करत आएशा श्रॉफ यांनी वांद्रे येथील पोलीस ठाण्यात फसवणूक आणि धमकी दिल्याचा आरोप करत दोन तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र या तक्रारीत तथ्य नसल्याचं सांगत साहिल खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती एसएस शिंदे आणि न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी पार पडली.


तेव्हा, साहिल खान आणि आयशा श्रॉफ यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दोघांमधील वाद सामंजस्याने मिटवण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. तसेच दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत खानने 4 कोटी रुपये थकवल्याचंही नमूद करण्यात आलं असलं तरीही आता हे प्रकरण वाढवायचं नाही असं श्रॉफ यांच्याकडून सांगण्यात आलं. त्याची दखल घेत हे प्रकरण व्यावसायिक वादातून निर्माण झाल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं साहिल खानच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही तक्रारी रद्द केल्या आहेत. मात्र, साहिल खानला एक लाख रुपयांचा दंड ठोठावत सदर रक्कम महाराष्ट्र बालकल्याण समितीकडे जमा करण्याचे निर्देश दिले.


कोण आहे साहिल खान?
साहिल खानने 2001 साली आलेल्या ‘स्टाईल’ या सिनेमात काम केले असून उत्तम आणि पिळदार शरीरयष्टीमुळे साहिलला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर 2010 साली साहिल खान 'रामा: द सेवियर' चित्रपटात तनुश्री दत्ता, द ग्रेट खली यांच्यासोबत झळकला होता. त्यानंतर मात्र साहिल खान अचानक स्पॉटलाइटमधून गायब झाला. बॉलिवूड सोडल्यानंतर फिटनेसला प्राधान्य देत त्याने व्यायामालाच पूर्णवेळ स्वीकारले आणि गोव्यात 'मसल्स अँड बीच' नावाची जिम सुरू केली.


महत्वाच्या बातम्या :