मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी बॉडीगार्डविरोधात गुरुवारी (20 मे) मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचं वचन देऊन 30 वर्षीय ब्युटिशियनवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या बॉडीगार्डविरोधात मुंबईच्या अंधेरीतील डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी (19 मे) संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार महिलेच्या माहितीनुसार, "माझी आणि आरोपी बॉडीगार्डची आठ वर्षांपूर्वी भेट झाली होती. आधी मैत्री झाली मग मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर मागील वर्षी जुलै महिन्यात आरोपीने तिला लग्नासाठी विचारणा केली आणि तिने त्याचं प्रपोजल स्वीकारलं. मग आम्ही दोघे माझ्या फ्लॅटमध्ये एकत्र राहू लागलो. यादरम्यान आरोपीने अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्नाच्या मागणीकडे मात्र कायम दुलर्क्ष करत होता.
"घरात अडचण असल्याचं सांगून त्याने माझ्याकडून 50 हजार रुपये घेतले आणि 27 एप्रिल रोजी कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी गेला. पण कर्नाटकात पोहोचताच त्याने माझे फोन कॉल घेणं बंद केलं आणि त्यानंतर संपर्काबाहेर गेला," असं तिने तक्रारीत म्हटलं आहे.
ब्युटिशियनच्या तक्रारीत पुढे लिहिलं आहे की, "काही दिवसांपूर्वी आपल्याला एका महिलेचा कॉल आला, तिने आपण आरोपीची आई असल्याचं सांगितलं. दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने हे लग्न होऊ शकत नाही. शिवाय कुटुंबीयांनी मुलासाठी योग्य वधू शोधली आहे, असंही आरोपीच्या आईने सांगितलं."
आरोपी त्याच्या गावातील मुलीसोबत 5 जून रोजी लग्न करणार असल्याचं तक्रारदार महिलेला समजलं. त्यानंतर तिने मुंबई पोलिसात धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 376, 377 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्याला अद्याप अटक केलेली नाही.