मुंबई : मुंबईतील कलिनामधील झोपडपट्टीमध्ये 4 बाय 4 च्या घरात राहणाऱ्या सनी पवारचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव होणार आहे. 11 वर्षांच्या सनी पवारला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. चिप्पा (CHIPPA) या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सनीने यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या 2016 मधील 'लायन' या हॉलिवूड चित्रपटात अभिनेता देव पटेलच्या लहानपणीची भूमिका साकारली आहे.




आई-वडिलांसाठी मोठं घर घ्यायचंय : सनी पवार
"हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंदी आहे. याचं श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. मला रजनीकांत यांच्यासारखा मोठा कलाकार व्हायचं आहे. आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करायची आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे," अशी प्रतिक्रिया सनी पवारने दिली. आई-वडिलांसाठी एक मोठं घर घेण्याचं स्वप्न सनी पवारने उराशी बाळगलं आहे.


पुरस्कारांची श्रीमंती
सनी पवार हा कलिनाच्या कुंची कुर्वेनगर भागातील झोपडपट्टीमध्ये राहतो. मात्र आर्थिक परिस्थिती गरिबीची असली तरी पुरस्कारांनी तो श्रीमंत आहे. सनी पवारकडे पुरस्कारांचा खजिना आहे. त्याच्याकडे 'अॅक्टा'पासून 'द एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड'मध्ये स्पेशल मेंशन ग्रॅण्ड ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.

बराक ओबामा, ट्रिपल एचसोबत भेट
सनी पवार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनाही भेटला आहे. व्हाईट हाऊसमध्ये ओबामा यांनी आपल्याला भेटल्यावर नमस्ते केलं आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याचं त्याने सांगितलं. यासोबतच डब्लूडब्लूई सुपरस्टार ट्रिपल एचनेही भेट म्हणून बेल्ट दिल्याचं सनी पवार म्हणाला.

सनीमुळे ओळख मिळाली : दिलीप पवार
सनीचा आपल्याला अतिशय अभिमान असल्याची भावना त्याचे वडील दिलीप पवार यांनी व्यक्त केल्या. "सनीमुळे आपल्याला ओळख मिळाली. त्याचे शिक्षक फारच मदत करतात. त्याला आता कधीही शूटिंगसाठी जायचं असेल तेव्हा शाळेतील शिक्षक त्याच्या अभ्यासाची काळजी घेतात. शिवाय सुट्टीही देतात," असं दिलीप पवार यांनी सांगितलं.