'यंग्राड' या शब्दाचा अर्थ नेमका काय बघायला हवं. मराठीत गेल्या काही महिन्यांपासून असे गावरान शब्द कॉईन करुन सिनेमाची नावं देण्याची पद्धत आहे. म्हणजे, फॅंड्री, सैराट, ख्वाडा ही त्याची काही उदाहरणं. मकरंद माने दिग्दर्शित 'यंग्राड' म्हणजे वयात आलेली टवाळखोर मुलं. हा सिनेमाही अशाच टवाळखोर मुलांचा आहे. टीन एजमध्ये आलेल्या मुलांच्या ऊर्जेचा योग्य वापर केला नाही तर त्याचा स्फोट होऊ शकतो, आणि त्यातून मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते, असं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न मकरंद माने याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
माने यांनी यापूर्वी केलेल्या 'रिंगण' या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या सिनेमाबद्दल उत्सुकता होती. शिवाय फॅंटम फिल्म यांनी या चित्रपटाला पाठबळ दिल्यामुळे ही उत्सुकता वाढते. ही गोष्ट चार मुलांची आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय वर्गातले चार टवाळखोर मित्र. एकमेकांसाठी जीव देणारे. अभ्यासात फार रुची नसलेले. या चार मुलांच्या आयुष्यात एक घटना घडते, आणि या चौघांचं आयुष्य बदलतं. त्या बदलणाऱ्या आयुष्याची गोष्ट दिग्दर्शकाने यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातून या चौघांचं आयुष्य मांडतानाच, सिस्टिमची दडपशाही, भ्रष्टाचारही यात मांडण्यात आला आहे.
या सिनेमाच्या गोष्टीत चार मित्रांचे ट्रॅक आहेत. शिवाय त्यात एक प्रेमाचा ट्रॅकही आहे. सिनेमाचा पूर्वार्ध पाहताना, आपण सैराट किंवा बबन या जातकुळीतली फिल्म पाहणार आहोत की काय असं वाटून जातं. तरी पहिला भाग क्राफ्टेड आहे. पण उत्तरार्ध मात्र कमालीचा गोंधळलेला वाटतो. चार मित्रांची कथानक जुळवून आणेपर्यंत या पटकथेत दमछाक झालेली दिसते. आजच्या काळातलं कथानक दाखवताना त्यात बदलत्या काळाचं भान दिसत नाही. अगदीच उदाहरण द्यायचं, तर या मुलांना एका खोट्या केसमध्ये अडकवलं जातं. न्यायालयासमोर उभं केलं जातं. आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्यांना शिक्षा होते, पण ते सीसीटीव्ही फुटेज तोकडं वाटतं. या फुटेजवर न्यायालय शिक्षा सुनावणं अशक्य वाटतं. शिवाय न्यायाधीशांनी प्रकरण मॅनेज करुन शिक्षा सुनावली जरी, तरी तसं शंकास्पद फुटेज तिथं असायला हवं होतं असं वाटून जातं.
संवाद, संगीत हे ठीक आहे. यातली गाणीही श्रवणीय आहेत. अपवाद शेवटच्या गाण्याचा. शंकर महादेवन यांनी गायलेलं गाणं चालीनं रसभंग करणारं आहे. शिवाय त्याची कोरिओग्राफीही. त्यामुळे सिनेमाचा जो इम्पॅक्ट दिग्दर्शकाला अपेक्षित आहे, तो येता येता राहतो. म्हणून हा सिनेमा पकड घेत नाही. हादरवून सोडत नाही. हूरहूर लावत नाही. तो घडत जातो, तसा आपण तो सिनेमा पाहात जातो. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळालेला आहे ओके-ओके स्मायली. हा एक अॅव्हरेज सिनेमा बनला आहे.
एकूणात, हा सिनेमा बनवण्याचा हेतू कळत असला, तरी यंग्राड तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयस्वी ठरतो. या सिनेमा आणखी काहीतरी हवं होतं हे वाटत असतानाच, काही गोष्टी टाळता आल्या असत्या असंही वाटून जातं. म्हणूनच हा एक अॅव्हरेज सिनेमा बनतो. एबीपी माझावर पिक्चर बिक्चरमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेते शशांक शेंडे यांच्यासह सिनेमाची समीक्षा पाहायला विसरू नका.