‘याड लागलं’ची चाल, ‘धडक’चं नवं गाणं रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2018 10:16 PM (IST)
‘धडक’मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाचा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. या गाण्याला 'सैराट'मधील 'याड लागलं' गाण्याची चाल दिली आहे.
मुंबई : सैराटचा रिमेक असलेल्या ‘धडक’ या सिनेमातील तिसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘पहली बार’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला अजय गोगावले यांनी आवाज दिला असून अजय-अतुल या सुपरहिट जोडीने संगीत दिलं आहे. सैराटप्रमाणेच ‘धडक’च्या गाण्यातही सुंदर व्हिडीओग्राफी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘धडक’मध्ये इशान खट्टर आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाचा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. ‘पहली बार’ हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी ‘धडक’मधील ‘झिंगाट’ हे गाणं रिलीज झालं होतं. पण मराठीतील ‘झिंगाट’च्या तुलनेत हिंदीतील ‘झिंगाट’ गाणं प्रेक्षकांना विशेष आवडलं नव्हतं. अनेकांनी ‘झिंगाट’च्या हिंदी व्हर्जनवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. 'धडक' हा नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'सैराट' या मराठी सिनेमाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'सैराट'मध्ये आर्ची-परशाची जोडी होती, तर 'धडक'मध्ये मधुकर आणि पार्थवी अशी मुख्य व्यक्तिरेखांची नावं आहेत. सैराटची कथा सोलापुरात घडते तर धडकमध्ये राजस्थानची पार्श्वभूमी आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शशांक खैतानने पेलली आहे. 'धडक' चित्रपट 20 जुलै 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील 'तेरे नाम की कोई धडक है ना' आणि झिंगाट ही 'धडक'मधील गाणी रिलीज झाली आहेत.