काय कमाल असते बघा. म्हणजे, घरोघरी तेच पोहे, तीच हळद, तेच मीठ, तीच फोडणी, तोच कांदा आणि तोच बटाटा असतो. पण प्रत्येक घरातल्या कांदा पोह्याची चव वेगळी असते. का होत असेल असं? आपण रोज घरी भाकरी-भाजी खात असतोच. पण गावाकडं गेल्यावर चुलीवरची भाकरी आणि पाटा वरवंट्यावर वाटण करून बनवलेली भाजी खाण्यातली मौज वेगळी असते. जिन्नस तेच. पद्धत तीच. पण चव कशी बदलत असेल? शिकल्या सवरल्या बायकांचं ठीक आहे. पण न शिकलेली अडाणी बाई केवळ अंदाजाने 20-25 लोकांचं जेवण बनवते, त्यावेळी फाईव्ह स्टार हाॅटेलच्या तोंडात मारेल अशी चव कशी येते?


ही सगळी नेमकी कसली कमाल असते? या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं सचिन कुंडलकरचा नवा गुलाबजाम हा चित्रपट देतो. म्हणजे, या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. त्यावेळी त्यातली राधा ज्यावेळी प्रत्येक पदार्थ बनण्यापमागची तिची भावना सांगत असते, तेव्हा वाटतं, घरातली प्रत्येक बाई आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करताना, गोडधोड बनवताना असाच विचार करत असेल का? दिसायला देखणा आणि चवीला रुचकर असणारा पदार्थ बनवणारी स्त्री किंवा पुरुष मनानेही खरंच तसा अस्सल असतो का? की त्याची तशा असण्याची आपली वेगळी रेसिपी कारणीभूत असते?

गंध, रेस्टाॅरंट, वजनदार, हॅपी जर्नी असे सिनेमे देणाऱ्या सचिन कुंडलकर यांचा हा नवा सिनेमा आपल्याला माणूस आणि पदार्थ यांचा थेट संबंध सांगतो. अगदी सोप्या भाषेत. समजायला अतिशय सोपा, दिसायला देखणा आणि सिनेमा म्हणून सर्वांगसुंदर असा हा चित्रपट आहे हे नक्की. मग प्रश्न असा येतो की हा चित्रपट खरंच फक्त खाण्यावर आहे की आणखी काही गोष्ट यात दडली आहे? हा फक्त फूड मूव्ही नाही. यात अनेक मराठी पदार्थ दिसतात. त्याचं बनणं दिसतं. पण त्याही पलिकडे या खाण्यानिमित्ताने एकत्र आलेल्या दोघांची कहाणी हा सिनेमा सांगतो.

ही गोष्ट राधा आणि आदित्यची आहे. आदित्य लंडनला बॅंकेत नोकरी करतो. तिथे खूप मराठी माणसं आहेत. पण लंडनमध्ये मराठी रेस्टाॅरंट नसल्याची सल त्याला आहे. आदित्यला स्वयंपाक करण्यातही रुची आहे. म्हणून लंडनमधल्या नोकरीला लाथ मारून हा पठ्ठ्या पुण्यात दाखल झाला आहे. याच पुण्यात त्याला चाखायला मिळतो तो राधाबाईंचा डबा. त्या डब्यातले गुलाबजाम त्याला त्याच्या आईची आठवण करून देतात. आणि स्वयंपाक शिकायचा तर तो राधाबाईंकडूनच असा हिय्या करून आदित्य राधाबाईंचं घर गाठतो. राधा मुळातच हेकेखोर, एकलकोंडी.. अगदी माणूसघाणी म्हणता येईल अशी. आलेल्या आदित्यला बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या आदित्यसोबत तिचा नवा संघर्ष सुरू होतो. पुढे परस्परांमध्ये तडतडणारी ही गोष्ट वेगवेगळ्या वळणावर जाते, त्यातून हा गुलाबजाम तयार होतो.

बऱ्याच दिवसांनी हा एक सर्वांगसुंदर चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. उत्तम कथा, पटकथा आणि सोपे आणि चित्तवेधक संवाद ही या चित्रपटाची बलंस्थानं. सोबत खाण्यावरचा सिनेमा असेल तर तो उत्तम दिसायला हवा. याची पुरेपूर काळजी छायांकनात घेण्यात आली आहे. मिलिंद जोग यांचा कॅमेरा लाजवाब आहे. संकलन, पार्श्वसंगीत, कलादिग्दर्शन या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट यशस्वी झाला आहे. याला सहज अभिनयाची जोड दिली आहे ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी.

हा चित्रपट फक्त रेसिपीवर  बोलत नाही. फक्त खाण्याचे पदार्थ दाखवत सुटत नाही. या खाण्याशी संबंधित असलेल्या माणसांची आपली अशी एक गोष्ट आहे. तीही वेधक आहे. म्हणूनच एक चांगला चित्रपट पाहिल्याचा अनुभव हा चित्रपट देतो. हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा आपण. या चित्रपटाला पिक्चरबिक्चरमध्ये मिळाला आहे रेड हार्ट. नक्की पहा.