उपेंद्र सिधये हा लेखक खरंतर. लिहिता लिहिता त्याला वाटलं आता दिग्दर्शन करावं. म्हणून त्यांने निवडली गर्लफ्रेंडची गोष्ट. मुळात लेखनाचं अंग असल्याचा मोठा फायदा त्याला झाला. हा सिनेमा पाहताना तो लिहिला नीट गेल्यामुळे पुढे चित्रित करणं सोपं गेलं असावं असं नक्की वाटतं. अमेय वाघ, सई ताम्हणकर, कविता लाड, यतिन कार्येकर असे अनुभवी कालाकार घेऊन त्याने सिनेमा बनवला आहे. सिनेमाची गाणी तोंडावर रूळताहेत. अमेय आणि सई असल्यामुळे सिनेमाला फ्रेशनेस मिळाला आहे. मुळात धक्का देणाऱ्या अनेक बाबी या गोष्टीत घातल्यामुळे हा सिनेमा खिळवून ठेवतो. मजा आणतो. म्हणूनच हा दिग्दर्शक आपल्या पहिल्याच चित्रपटात फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने पास होतो.
नचिकेतचं लग्नाचं वय उलटून चाललं आहे. पण आजवर त्याला एकही गर्लफ्रेंड नाही. तो सतत यामुळे चेष्टेचा विषय होतो. लोकांना आयतं गॉसिप नचिकेतच्या रुपानं चघळायला मिळतं आहे. अत्यंत प्रामाणिक, हुशार, सह्रदयी असूनही नचिकेतचं असं असणं त्याच्या आई वडिलांना बुचकळ्यात टाकतं. आणि भरीत भर अशी की नचिकेतची बर्थ डेट आहे 14 फेब्रुवारी. म्हणजे, ज्या दिवशी अख्खं जग आपआपल्या जवळच्या व्यक्तिंसोबत मग्न असतं तेव्हा गुरूजींना साधं विश करणारंही कुणी नसतं.. असा सगळा मामला. यातून उद्गिग्न होऊन एक दिवस नचिकेत एक निर्णय घेतो.. तोही फेसबुकच्या साह्याने. त्या निर्णयाचं काय होतं.. त्याच्या आयुष्यात अलिशा कशी येते.. तिचं पुढं काय असतं.. अशा घटनांचा.. प्रसंगांचा मिळून गर्लफ्रेंड बनला आहे.
अत्यंत सुंदर पटकथा हे या सिनेमाचं बलस्थान आहे. सिनेमा सुरूच होतो तो 14 फेब्रुवारीपासून. पहिल्या त्या संपूर्ण दिवसात नचिकेतचं व्यक्तिमत्व, कुटुंब, मित्रमंडळी यांचा अंदाज येतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात येये आलिशा. कथाबीज फार रंजक असल्यामुळे पटकथाही तितकीच खिळवून ठेवते. आवर्जून उल्लेख करायला हवा तो मध्यंतराचा. अत्यंत अचूक पॉइंटवर सिनेमा थांबतो आणि उत्तरार्ध सुरू होतो. त्यात अलिशाला दिलेल्या सवयी.. तिचं गूढ वागणं.. नचिकेत आणि अलिशामध्ये सुरू असलेला करार.. अशा अनेक गोष्टींमुळे सिनेमा रंजक होतो. याला उत्तम जोड आहे पार्श्वसंगीताची आणि संगीताची. कोडे थोडे सोपे.. सह दोन्ही गाणी श्रवणीय झाली आहेत. संकलन, छायांकन या सर्वच पातळ्यांवर चित्रपट अपेक्षापूर्ती करतो.
यातल्या नचिकेतच्या भूमिकेसाठी अमेयने आपलं वजन वाढवलं आहे. खरंतर त्यातल्या भूमिकेची निकड पाहता अमेय सुरूवातीला लहान वाटतो. पण नंतर तो आपल्या अभिनयाच्या जोरावर व्यक्तिरेखा आणि अमेय यांच्यातलं अंतर कमी करतो. यात सई ताम्हणकरला पाहाणं कमाल आहे. बऱ्याच दिवसांनी तिला खूप टवटवीत वाटेल अशी भूमिका मिळाली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसते. कविता लाड, यतिन कार्येकर यांच्यासह चित्रपटातल्या सर्वच कलाकारांनी मजा आणली आहे.
पटकथेमध्ये वाटता वाटता राहणारी बाब अशी की या सिनेमाची लांबी थोडी वाढलेली वाटते. सुरूवातीचा नचिकेतचा दिवस दाखवताना डिटेलिंग खूप झाल्यानं तो प्रकार थोडा रेंगाळलेला वाटतो. त्यानंतर रात्री बारानंतर मात्र सिनेमा फिरतो. तोच प्रकार सिनेमाच्या शेवटी. शेवटची पाचेक मिनिटंही लांबलेली वाटतात. एकूणात सिनेमाची लांबी 15 मिनिटं कमी असती तर सिनेमा आणखी गोळींबंद झाला असता असं वाटतं. पण हरकत नाही. सिनेमा आनंद देतो. मजा आणतो. आणि तो आजच्या पिढीची भाषा बोलतो. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत साडेतीन स्टार्स.
हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा.
Movie Review | पटवावी वाटणारी 'गर्लफ्रेंड'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2019 11:27 PM (IST)
मुळात धक्का देणाऱ्या अनेक बाबी या गोष्टीत घातल्यामुळे हा सिनेमा खिळवून ठेवतो. मजा आणतो. म्हणूनच हा दिग्दर्शक आपल्या पहिल्याच चित्रपटात फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने पास होतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -