मानवी नातेसंबंध, मानवी स्वभाव.. माणसाचा बदलत जाणारा प्राधान्यक्रम (प्रायोरिटीज) याबद्दल दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना कमाल आकर्षण आहे. त्यांचे सिनेमे पाहिल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज येतो. उदाहरणादाखल बदलापूर, जाॅनी गद्दार, रमन राघव, एक हसीना थी असे त्यांचे सिनेमे गूढतेकडे नेतात. थरार दाखवतात पण तेवढंच न दाखवता आपल्याला मानवी नात्यांबद्दल एक नवा साक्षात्कार घडवण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांचा आलेला अंधाधुन याला अपवाद नाही. या चित्रपटात थरार आहे. उत्कंठावर्धक प्रसंग आहेत. हशा आहे. ह्युमर आहे. तिरकस कमेंट आहेत, उपहास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं दर प्रसंगागणिक माणसाच्या बदलत जाणाऱ्या प्रायोरिटीज आहेत. या सगळ्या घडामोडींकडे आंधळा नसून आंधळेपणाचं सोंग आणणारा एक नायक कशा पद्धतीने पाहतो हे दाखवण्याचा चोख प्रकार या सिनेमात आहे.

आपली चित्रपट या माध्यमावरची पकड, त्याची समज दिग्दर्शकाने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याचा आपल्याल अंदाज येतो. किंवा अंधाधुनची गाणी तुम्ही एरवी एेकली असतीलच, त्यात या चित्रपटाचा एक टायटल ट्रॅकही आहे. तो आपल्याला सगळं सांगतो.

या ओळी एकदा नीट वाचून पहा

शकने सबको जखडा है

सचने सबको पकडा है

बचना सबका मुश्कील है

सबका सब से लफडा है

हवा मे सबको ट्युन दिखे

सीने पे ना खून दिखे 

दिन मे सबको मून दिखे

जब अंधेको भी खून दिखे 

अंधा बोले मैने देखा

अंधे की ना सून

अंधाधुन 

या ओळींमधून हा सिनेमा नेमका काय आहे हे लक्षात येतं. आता गोष्ट अशी, मधुर हा पियानो वाजवतो. पियानो वाजवून गुजराण करणं. पैसे जमवून पियानो शिकायला लंडनला जाणं हे त्याचं स्वप्न आहे. त्यासाठी तो काही परीक्षाही देतोय. जी माणसं दृष्टीहीन असतात, त्यांची एेकण्याची क्षमता सामान्य माणसापेक्षा कैकपट तीक्ष्ण असते असं त्याचं म्हणणं. शिवाय ही मंडळी जास्त फोकस्ड असतात. म्हणून डोळे असूनही आंधळेपणाचं नाटक करत जगण्यात हा मधूर धन्यता मानत असतो. गडद काळ्या गाॅगलपलिकडे असलेली नजर शोधण्यात अपयशी ठरलेल्या मंडळींची गंमत हा इसम पाहात असतो. सगळं आलबेल उत्तम चालू असताना, एक दिवस अचानक एक खून या वरवर आंधळा असलेल्या मधूरच्या नजरेस पडतो. त्यातून ही गोष्ट आकाराला येते. अर्थात हा एक खून होणं ही सिनेमाची पूर्ण गोष्ट नाही. किंवा मधूर आंधळा नसणं हा क्लायमॅक्स फोडल्यासारखंही नाही. कारण सिनेमा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत या बाबी लक्षात येतात. खरी गंमत पुढे आहे. या खुनाच्या मागे मागे जाता जाता मधूरच्या मागे लागलेला काही लोकांचा ससेमिरा ही या सिनेमाची गंमत आहे. शिवाय ही सगळी मंडळी एकमेकांपेक्षा वेगळी असली तरी त्या सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे. या सगळ्या व्यक्तिरेखांच्या सरमिसळीतून ही आंधळी कोशिंबीर आकाराला येते.

दिग्दर्शकाला इथे फक्त थरार अपेक्षित नाहीय. त्याला या प्रसंगांमधून मानवी नितीमूल्यांचा होणारा ऱ्हासही दाखवायचा आहे. उपहासही अधोरेखित करायचा आहे. एकामागोमाग घडत जाणाऱ्या प्रसंगामधून तयार होणारी द्विधा, एकातून बाहेर पडता पडता अडकत जाणं.. ज्याला आपण आगीतून फुफाट्यात म्हणतो असे सगळे प्रकार या सिनेमात पाहता येतात. शिवाय यात गडद रंगाचा चढवलेला गाॅगल हे सूचक आहे. पाहून न पाहिल्यासारखं करण्यापासून, काही गोष्टी पाहता न येण्यासारख्या अनेक छटा हा सिनेमा पहाताना दिसत राहतात.

या गोष्टीला उत्तम साथ दिली आहे ती कलाकारांनी. आयुषमान खुराना, तब्बू, राधिका आपटे, छाया कदम या सगळ्यांनीच कमाल केली आहे. अर्थात त्यावर दिग्दर्शकाची पकड दिसते. लेखन, दिग्दर्शन, संकलन, संगीत, अभिनय, कलादिग्दर्शन, छायांकन या सगळ्याच पातळ्यांवर हा चित्रपट अव्वल उतरतो. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये आपण या चित्रपटाला देतो आहोत चार स्टार.

असे चित्रपट वारंवार बनत नसतात. श्रीराम राघवन यांनी आणखी एक चांगला चित्रपट लोकांसमोर आणला आहे. तो थिएटरमध्ये जाऊन पाहण्यात मजा आहे. हा चित्रपट चुकवू नये असाच. जरूर थिएटरमध्ये जाऊन पाहा.