Misal Pav : महाराष्ट्राच्या लोकप्रिय पदार्थांच्या यादीत 'मिसळ पाव'चा (Misal Pav) समावेश आहे. मिसळप्रेमी दिवसभरात केव्हाही मिसळ खायला तयार असतात. यात कलाकारदेखील मागे पडलेले नाहीत. आपलं डाएट सांभाळत हे कलाकार त्यांच्या आवडीची मिसळ खायला प्राधान्य देत असलेले दिसून आले आहेत. यात खिलाडी कुमारपासून (Akshay Kumar) अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. आता जगातील 50 पारंपारिक विगन (Vegan) पदार्थांची यादी टेस्ट अॅटलासकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मिसळ ही अकराव्या स्थानावर आहे. 


अक्षय कुमारची 'श्रीमंत मिसळ'!


अक्षय कुमार (Akshay Kumar) : अक्षय कुमारचा गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो पुण्यातील चटकणार, झणझणीत मिसळवर ताव मारताना दिसून आला होता. पुण्यातील 'श्रीमंत मिसळ' खायला अक्षय अनेकदा जात असतो. 


प्रथमेश परब म्हणतो,"अण्णा, एक प्लेट मिसळ"


प्रथमेश परब (Prathamesh Parab) : प्रथमेश परबला डहाणुकर कॉलेजच्या कॅंटीनमध्ये मिळणारी मिसळ प्रचंड आवडते. 'बालक-पालक' या एकांकिकेच्या तालमीदरम्यान प्रथमेश तासनतास कॉलेजमध्ये असायचा. त्यामुळे पोट भरण्यासाठी तो कॉलेजच्या कॅंटीनमध्ये जाऊन मिसळवर ताव मारत असे. आजही कॉलेजच्या कॅंटीनमध्ये गेल्यावर तो त्याची आवडती मिसळ खातो. 


अभिषेक बच्चन ठाण्यातील मामलेदार मिसळीच्या प्रेमात


अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) : अभिषेक बच्चन ठाण्यातील मामलेदार मिसळीच्या प्रेमात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तो म्हणाला होता की,"माझ्या मते उत्तम मिसळ ठाण्यात मिळते..ती म्हणजे मामलेदारची मिसळ". 


नाशिकची साधना मिसळ सेलिब्रिटींची आवडती


रितेश देशमुख (Riteish Deshmukh) : साधना मिसळची लोकप्रिय चुलीवरची मिसळ खूपच लोकप्रिय आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह अनेक सेलिब्रिटीदेखील या मिसळीवर ताव मारताना दिसतात. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख नाशिकच्या साधना मिसळवर ताव मारताना दिसून आले आहेत. 


श्रद्धा कपूरलाही मिसळची भूरळ


श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) : श्रद्धा कपूरने गेल्या काही दिवसांपूर्वी 'वॉव मिसळ पाव' असं म्हणत मिसळ खातानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत श्रद्धा मिसळीचा आनंद लुटताना दिसून आली. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे श्रद्धा कपूरलादेखील मिसळची भूरळ पडल्याचं दिसून आलं. 


डॉ. श्वेता पेंडसेला आवडते लालबागची मार्तंड मिसळ


डॉ. श्वेता पेंडसे (Shweta Pendse) : मराठमोळी अभिनेत्री श्वेता पेंडसेला लालबागची मार्तंड मिसळ आवडते. 'मार्तंड मिसळ'मध्ये मिसळसोबत मिळणारं ताक, वेगवेगळ्या पद्धतीचे फर्सान आणि गुलाबजाम श्वेला आवडतं. त्यामुळे चाहत्यांनादेखील मार्तंड मिसळ खाण्याचा सल्ला श्वेता देते. 


संबंधित बातम्या


'महाराष्ट्राची मिसळ पाव 1 नंबर!', मिसळीचा आस्वाद घेताना सचिननं शेअर केला खास व्हिडीओ