Masoom Sawaal Controversy : 'मासूम सवाल' (Masoom Sawaal) या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचा फोटो दाखवल्यामुळे हा चित्रपट आता वादात सापडला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्याच्या पोलिसांनी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय, त्यांचे प्रोडक्शन हाऊस आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमविरोधात एफआयआर नोंदवला आहे. ‘चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचा फोटो लावून चित्रपट निर्मात्याने जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावण्याचे कृत्य केले आहे’, असे हिंदु राष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित राठोड यांनी म्हटले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित राठोड यांनी केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. साहिबाबादचे पोलीस अधिकारी स्वतंत्र सिंह यांनी सांगितले की, भारतीय दंड संहिता कलम 295 (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाचे नुकसान करणे किंवा अपवित्र करणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.


धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप


निर्माता-दिग्दर्शकाने जाणूनबुजून हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने महिला वापरत असलेल्या सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचा फोटो प्रकाशित केला आहे, जो या चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहे. निर्मात्याच्या या कृत्यामुळे 'सनातन धर्मा'च्या अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, त्यामुळे उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात जातीय दंगली होऊ शकतात, असे राठोड यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि ‘निर्माण नक्षत्र 27 मीडिया’ची टीम यांच्याविरुद्ध साहिबाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'मासूम सवाल' हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे.


नेटकरीही संतापले!


'मासूम सवाल' या चित्रपटाच्या पोस्टरवरून आता सोशल मीडियावर देखील वाद सुरू झाला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कृष्णाचा फोटो सॅनिटरी पॅडवर दाखवण्यात आला आहे, ज्यावर नेटकरी आक्षेप घेत आहेत.





या चित्रपटाची कथा कमलेश के मिश्रा यांनी लिहिली असून, संतोष उपाध्याय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये अनेक नवीन चेहरे दिसले आहेत. या चित्रपटाची कथा महिला आणि मुलींच्या मासिक पाळीबद्दल पसरलेल्या अंधश्रद्धा आणि सामाजिक रूढींवर आधारित आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.


हेही वाचा :